पावसाअभावी १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र पडीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 11:37 PM2018-08-03T23:37:15+5:302018-08-03T23:39:28+5:30
जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे.
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. यापैकी खरीप हंगामात १ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरमध्ये धान लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मात्र पावसाअभावी यंदा १ लाख ७७ हजार ०९४ हेक्टर क्षेत्रामध्येच धानाची रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाने शासनाने पाठविलेल्या अहवालात वर्तवीली आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता आहे.
यावर्षी जिल्ह्यात १५ ते १७ जुलैदरम्यान दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीबांधव सुखावले होते. रोवणीच्या कामाला सुद्धा वेग आला होता. मात्र तेव्हापासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर काही शेतकºयांची रोवणी खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमध्येच रोवणी झाली. रोवणीची ही टक्केवारी ७६.८८ आहे. जिल्ह्यातील २३.१२ टक्के क्षेत्रातील रोवणी पावसाअभावी खोळंबल्याचे चित्र आहे.
१ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरऐवजी एक लाख ७७ हजार ०९४ हेक्टरमध्येच रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता आहे.
तर परिस्थिती गंभीर
पावसाअभावी मागील काही दिवसांपासून उष्णतामान वाढले आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. ज्या शेतकºयांची रोवणी झाली त्यांना सुध्दा पावसाची गरज आहे. तर पावसाअभावी २३ टक्के रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात झालेली रोवणी
जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमधील रोवणीपैकी धानाची नर्सरी १८०२०.१९ हेक्टर क्षेत्रात लावण्यात आली. प्रत्यक्षात रोवणी एक लाख २८ हजार ४१३.२९ हेक्टरमध्ये झाली. तर आवत्या ७७३३.९८ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. तालुकास्तरावर गोंदिया तालुक्यात २६ हजार ३५६.९२ हेक्टर, गोरेगावात १५ हजार ५३० हेक्टर, तिरोडा येथे १७ हजार ७०८.६० हेक्टर, सडक-अर्जुनी येथे १५ हजार २४० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव येथे १९ हजार १४९, आमगावात १४ हजार ३५४.९५ हेक्टर, सालेकसा येथे १० हजार ३८५.८० हेक्टर व देवरी येथे १४ हजार ४२४ हेक्टरमध्ये रोवणी आटोपली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्त
सध्या खरीप हंगाम सुरु असून शेतकºयांना विविध कामांसाठी कृषी विभागाशी संबंध येतो. मात्र गोंदिया येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. रोवणी आणि दुष्काळी परिस्थितीचे अहवाल पाठविण्यास सुध्दा विलंब होत असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांची बदली अमरावती येथे झाली असून ते तेथे रुजू सुद्धा झाले आहेत. मात्र नगरहून गोंदियाला बदली झालेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अद्यापही गोंदियाच्या कार्यालयात रुजू झाले नाहीत. ते १० ते १२ तारखेच्या नंतर रुजू होणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.