१४१ विहिरींचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:21 PM2018-04-24T23:21:22+5:302018-04-24T23:21:22+5:30

गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५० विहिरी सालेकसा तालुक्याला देण्यात आल्या. मात्र तालुक्यात एकूण २५० पैकी १४१ विहीरींचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

141 wells work well | १४१ विहिरींचे काम अर्धवट

१४१ विहिरींचे काम अर्धवट

Next
ठळक मुद्देतालुक्यात २५० मंजूर विहिरी : ४३ टक्के विहिरींचे काम पूर्ण

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा :गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५० विहिरी सालेकसा तालुक्याला देण्यात आल्या. मात्र तालुक्यात एकूण २५० पैकी १४१ विहीरींचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यासह पूर्वी विदर्भात मागेल त्याला विहीर योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत पूर्वी विदर्भात एकूण ११ हजार सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या मोहिमेची सुरुवात डिसेंबर २०१६ मध्ये झाली असून दीड वर्ष लोटूनही निम्यापेक्षा जास्त विहिरींचे काम अर्धवट आहे. येत्या खरीप हंगामापूर्वी सर्व विहिरींचे काम पूर्ण होण्याचा दावा संंबंधित विभाग करीत असला तरी ज्या वेगाने काम चालत आहे त्यानुसार सर्व विहिरी यंदा पूर्ण होतील की नाही, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागातर्फे सदर सिंचन विहिरींचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील खरीप हंगामापूर्वी काही मोजक्या विहिरींचे काम पूर्ण झाले होते. बाकीच्या विहिरींचे काम यंदा सुरु करण्यात आले आहेत. २५० पैकी आतापर्यंत फक्त १०९ विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. तर १४१ विहिरींचे काम सुरू असून त्यापैकी २४ विहिरींचे काम ९० टक्क्यांवर पोहोचले आहे.
एकूण २५० विहिरींच्या कामाची देखरेख तीन अभियंत्यांकडे आहे. शाखा अभियंता यु.एम. इसळ यांच्याकडे १३४, एस.एम. मेश्राम ४६ आणि डी.एम. गायधने यांच्याकडे ६९ विहिरींचे काम देण्यात आले आहे. यापैकी इसळ यांच्याकडील ६५, मेश्राम यांच्याकडील २० विहिरी आणि गायधने यांच्याकडील २४ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे.
यात १०४ विहिरींमध्ये बोअरवेल खोदण्यात आले असून अशा १०३ विहिरींमध्ये पुरेसा पाणी लागलेला आहे. ज्या १४१ विहिरींचे काम होणे बाकी आहे, त्यात २५ टक्के काम पूर्ण झालेल्या २४ विहिरी, ५० टक्के काम पूर्ण झालेल्या ६४ विहिरी, ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या ३२ विहिरी आणि ९० टक्के काम पूर्ण झालेल्या एकूण २४ विहिरी आहेत. शाखा अभियंता यु.एम. इसळ यांच्या देखरेखीतील १३४ पैकी ६५ विहिरींचे काम पूर्ण झाले. ७४ विहिरींचे काम अपूर्ण आहे. एस.एम. मेश्राम यांच्याकडील ४६ विहिरींपैकी २० विहिरी पूर्ण झाल्या असून २७ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. तर डी.एम. गायधने यांच्याकडील ६९ विहिरींपैकी २४ विहिरींचे काम पूर्ण झाले असून ४५ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे.
एकूण विहिरींसाठी सहा कोटींचा खर्च
सालेकसा तालुक्याला जिल्ह्यातील दोन हजार मंजूर विहिरींपैकी २५० विहिरी मंजूर करण्यात आल्या. यासाठी एकूण सहा कोटी २५ हजारांचा निधी आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत तीन कोटी ७७ लाख ५० हजार रुपये एवढा निधी तालुक्याला प्राप्त झाला आहे. त्यापैकी तीन कोटी ७७ लाख १० हजार रुपये विहिरींच्या लाभार्थ्यांना टप्याटप्याने देण्यात आले. आतापर्यंत एकूण २१९ लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आला. फक्त ४० हजारांचा निधी शिल्लक आहे. उर्वरित निधी लवकर मिळावा व लाभार्थ्यांच्या विहिरींचे काम वेळेवर पूर्ण होऊन त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी आहे.
शेकडो शेतकरी प्रतीक्षा यादीत
मागेल त्याला विहीर योजनेंतर्गत शेतकºयांना सिंचनाची सोय म्हणून शासनाने बोअरवेलसह विहीर बनविण्याचे अनुदान शंभर टक्के देण्याची योजना राबविली. यानुसार सालेकसा तालुक्यात जवळपास ४०० च्या वर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले होते. तर काही इच्छुक शेतकरी विहीत वेळेत अर्ज करायला मुकले. परंतु शासनाने तालुक्याला फक्त २५० विहिरीच मंजूर केल्यामुळे शेकडोंच्या संख्येने शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. तर तालुक्याला विहिरींचा कोटा वाढविण्यात यावा व गरजू आणि वरथेंबी पावसावर अवलंबित शेतकºयांना विहीर बोअरवेलचा लाभ मिळावा, अशी मागणी सर्वसामान्य शेतकरीवर्ग करीत आहे.

Web Title: 141 wells work well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.