गोंदियाच्या ग्रामीण भागात होणार १.४५ कोटींचे रस्ते
By Admin | Published: August 27, 2014 11:41 PM2014-08-27T23:41:50+5:302014-08-27T23:41:50+5:30
गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात नागरिकांच्या मागणीवरून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत १५ रस्त्यांच्या डांबरीकरण कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात नागरिकांच्या मागणीवरून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत १५ रस्त्यांच्या डांबरीकरण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांची किंमत १ कोटी ४५ लाख आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी याबाबतची मागणी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
या रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी गोंदिया विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी आ.अग्रवाल यांच्याकडे वेळोवेळी केली होती. त्यानुसार त्यांनी याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना देऊन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याचा पाठपुरावा केला होता. नियोजन विभागाने २२ आॅगस्ट २०१४ रोजी याबाबतची मंजुरी दिली आहे. या रस्त्यांमध्ये रापेवाडा-गोदेखारी मार्ग, छोटा गोंदिया-भीमघाट-चुलोद मार्ग, राणी अवंतीबाई चौक-कटंगी रेल्वे क्रॉसिंग मार्ग, रतनारा-हरसिंगटोला मार्ग, तेढवा-मरारटोला-पुजारीटोला मार्ग, नागरा-गोवारीटोला मार्ग, कोचेवाही-बनाथर मार्ग, गोंदिया-बालाघाट राज्य मार्ग ते मोहरानटोली मार्ग, गोंदिया-बालाघाट राज्य मार्ग ते हलबीटोला-सावरी मार्ग, लोधीटोला-गर्रा घिवारी मार्ग, बलमाटोला-रायपूर मार्ग, हलबीटोला (खमारी)-तांडा मार्ग तसेच दासगाव-डांगोरली मार्गावर सीडीचे काम तसेच रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतर या कामांना सुरूवात होणार असल्याचे आ.अग्रवाल यांनी कळविले.
गोंदिया तालुक्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंजूर केलेल्या विशेष निधीअंतर्गत ४ कोटी रुपयांच्या निधीतून विविध जोडरस्त्यांची कामे तसेच ६ कोटीतून गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांच्या आवश्यकतेनुसार या रस्त्यांना मंजूरी मिळवून दिल्याबद्दल अग्रवाल यांचे अनेकांनी आभार मानले.