१५ गुन्हे असलेला सराईत दोन महिन्यांसाठी ३ जिल्ह्यातून तडीपार
By नरेश रहिले | Published: February 19, 2024 06:42 PM2024-02-19T18:42:14+5:302024-02-19T18:42:40+5:30
दत्त मंदिरचे मागे गोंदिया याला दोन महिन्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
गोंदिया: शहरात दरोडा घालणे, जबरी चोरी करणे, भांडण करून जबर दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, जबरीने इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, खंडणी मागणे, खंडणीकरिता अपहरण करणे, जबरीने अटकाव करणे, धमकी देणे, अश्याप्रकारचे १५ गंभीर गुन्हे घेऊन बसलेल्या प्रकाश उर्फ पप्पु हसनलाल टेंभरे (२९) रा. छोटा गोंदिया, दत्त मंदिरचे मागे गोंदिया याला दोन महिन्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पप्पू टेंभरे हा मगरूर व धाडसी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात त्याच्याविषयी दहशत निर्माण झाली आहे. त्याच्या गुन्हेगारी कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याच्याविरूद्ध पोलीस निरीक्षक गोंदिया शहर यांनी गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१),(अ),(ब) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला होता.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी विहीत मुदतीत हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून नमूद गुन्हेगाराला गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पर्वणी पाटील यांनी त्याला दोन महिन्याच्या कालावधीकरिता गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केली आहे.
यापूर्वीही दोन वेळा केले होते तडीपार
गोंदिया शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगार पप्पू टेंभरे याच्याविरुद्ध यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. २०१६ ला एक वर्षांकरिता आणि २०१९ मध्ये ६ महिन्यांकरिता तडीपार करून सुध्दा त्याच्या चारित्र्यात आणि वागण्यात कसलीही सुधारणा झालेली नाही.
अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून तसेच अवैध धंद्यांपासून परावृत्त व्हावे. इतर सन्मानजनक रोजगाराकडे वळावे. जेणेकरून तेही सुखी राहतील आणि इतर लोकही शांततेने जीवन जगतील. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. - निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया.