जिल्ह्यात यावर्षी १.५ लाख वृक्ष लागवड
By admin | Published: July 31, 2015 02:01 AM2015-07-31T02:01:49+5:302015-07-31T02:01:49+5:30
वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते.
गोंदिया : वृक्ष कटाईमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र यापैकी किती वृक्ष जगतात व किती मरतात, हा शोधाचा विषय ठरत आहे. दरवर्षी लागवड केलेल्या रोपट्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रोपटे जगतात, असे सामाजिक वनीकरण विभागाचे म्हणणे आहे. परंतु यात कितपत सत्यता आहे हे लागवड झालेल्या गावांनाच ठाऊक!
यंदा सामाजिक वनीकरण विभागाला एक लाख नऊ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी एक लाख पाच हजार ७०० वृक्षांची लागवड पूर्ण झालेली असून काम सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे. एक रोपटे लावण्यासाठी जवळपास ४५० रूपयांचे खर्च येते. यात रोपटे, पिंजरे, खड्डे व पाणी देणे या बाबींचा समावेश असतो. मात्र खरे काम वृक्ष लागवडीनंतर त्याचे संरक्षण व संवर्धनाचे असते. याकडे किती लक्ष दिले जाते, हासुद्धा शोधाचाच विषय.
दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात वृक्षारोपण केले जाते. जिल्ह्यात सन २०१२ मध्ये एकूण ७७ हजार ६८२ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७६ हजार ५०२ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९८ आहे. सन २०१३ मध्ये ८५ हजार ९०३ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यापैकी ७९ हजार ९८५ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ आहे. तर सन २०१४ मध्ये ७३ हजार ४६८ वृक्षांची लागवड जिल्ह्यात करण्यात आली होती. यापैकी ६८ हजार ४३८ रोपटे जगले असून याची टक्केवारी ९३ असल्याचे सामाजिक वनीकरण विभागातून सांगण्यात आले आहे.
सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात वृक्ष लागवड केली जाते. मात्र वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तेवढी जागा उपलब्ध असते का? याबाबत विचारणा केल्यावर आम्हाला त्याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरणाचे वृक्ष लागवड, संरक्षण व संवर्धनाचे उद्दिष्ट कागदावर साध्य होते की खरोखर कृत्यातून होते, यावर प्रश्नचिन्ह आहे. (प्रतिनिधी)