१५ हजार पर्यटकांनी केली ‘जंगल सफारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 08:40 PM2019-06-30T20:40:18+5:302019-06-30T20:40:44+5:30

धकाधकीचे जीवन व कॉँक्रिटचे जंगल आता सर्वांनाच नकोसे होत चालले असून मनाच्या शांतीसाठी सर्वांची निसर्ग सानिध्याकडे ओढ वाढली आहे. याचीच प्र्रचिती यंदाच्या उन्हाळ्यातून दिसून आली. येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात तब्बल १४ हजार ९४५ पर्यटकांनी जंगल सफारी केली. चिमुकल्यांसह मोठ्यांची यात गिनती असून जंगल सफारीचा मोह आता आवरता आवरेना असे काहीसे चित्र बघावयास मिळत आहे.

15 thousand tourists made 'jungle safari' | १५ हजार पर्यटकांनी केली ‘जंगल सफारी’

१५ हजार पर्यटकांनी केली ‘जंगल सफारी’

Next
ठळक मुद्देकॉँक्रिटच्या जंगलातून निसर्ग सानिध्यात : वन विभागालाही भरभरून उत्पन्न

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धकाधकीचे जीवन व कॉँक्रिटचे जंगल आता सर्वांनाच नकोसे होत चालले असून मनाच्या शांतीसाठी सर्वांची निसर्ग सानिध्याकडे ओढ वाढली आहे. याचीच प्र्रचिती यंदाच्या उन्हाळ्यातून दिसून आली. येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात तब्बल १४ हजार ९४५ पर्यटकांनी जंगल सफारी केली. चिमुकल्यांसह मोठ्यांची यात गिनती असून जंगल सफारीचा मोह आता आवरता आवरेना असे काहीसे चित्र बघावयास मिळत आहे.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून १२ डिसेंबर २०१३ रोजी राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र अस्तीत्वात आले आहे. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य व कोका अभयारण्य अशा एकूण चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. याचे क्षेत्रफळ ६५६.३६ चौरस किमी. एवढे आहे. विशेष म्हणजे, वाघोबाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. त्यात आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे.
व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. त्यात आजघडीला धकाधकीच्या जीवनात थोडा विसावा मिळावा यासाठी सिमेंट- कॉँक्रीटचे जंगल सोडून नागरिकांचा कल निसर्गाच्या सानिध्याकडे दिसून येत आहे. म्हणूनच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, उन्हाळ््यात शाळा-महाविद्यालयांना सुट्या असतात व वन्यप्राण्यांचेही दर्शन हमखास होते. अशात आपली सवड बघून १४ हजार ९४५ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्प गाठून जंगल सफारीचा आनंद घेतला.
यंदाच्या मार्च, एप्रिल व मे महिन्यातील ही आकडेवारी असून जंगल सफारी करणाऱ्या या १४ हजार ९४५ पर्यटकांत एक हजार ६८९ पर्यटक १२ वर्षा खालील तर १३ हजार ५०४ पर्यटक १२ वर्षावरील असल्याची माहिती आहे. यातील, मार्च महिन्यात तीन हजार ७८५, एप्रिल महिन्यात चार हजार ६२० पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पात हजेरी लावली असतानाच मे महिन्यात सर्वाधीक सहा हजार ५४० पर्यटकांनी ‘जंगल सफारी’ केली आहे.
फक्त ५२ विदेशी पर्यटकांचे आगमन
येथील नवेगाव-नागझिरा व्याग्र प्रकल्पाची आतरराष्ट्रीयस्तरावर ओळख निर्माण झाली आहे. वाघोबाचे घर म्हणून प्रकल्प ओळखले जात असताना कोठेतरी प्रकल्पाबाबत वन्यप्रेमींना माहितीचा अभाव दिसून येतो. कारण, उन्हाळ््याच्या या तीन महिन्यांत व्याघ्र प्रकल्पात फक्त ५२ विदेशी पर्यटकांनी हजेरी लावली आहे. लगतच्या कान्हा-केसली व ताडोबा प्रकल्पात मोठ्या संख्येत देशी-विदेशी पर्यटक ‘जंगल सफारी’साठी येत असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील विदेशी पर्यटकांची संख्या मात्र कमी दिसते. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
वन विभागाला १४ लाखांचे उत्पन्न
पर्यटकांच्या माध्यमातून आपली तिजोरी भरावी हा वन विभागाचा कधीही हेतू नसतो. उलट नागरिकांत वन व वन्यजीवांप्रती आत्मियता निर्माण होऊन त्यांचे महत्व कळावे या उद्देशातून वनविभागाकडून ‘जंगल सफारी’ची सुविधा उपलब्ध करवून दिली जाते. असे असले तरिही, पर्यटकांच्या हजेरीने वन विभागाला आर्थिक उत्पन्न होत असून उन्हाळ््यातील तीन महिन्यांत वन विभागाला १३ लाख ९७ हजार दोन रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Web Title: 15 thousand tourists made 'jungle safari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.