१५ पशूवैद्यकीय दवाखाने झाले ‘आयएसओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:03 AM2018-02-21T01:03:26+5:302018-02-21T01:03:44+5:30
आता यांत्रीकीकरण होऊ लागल्याने जनावरांची जागा यंत्राने घेतली असली तरी पशूधन किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याचे काम जिल्हा परिषदेचा पशू संवर्धन विभाग करीत आहे.
नरेश रहिले ।
ऑनलाईन लोकमत
गोंदिया :आता यांत्रीकीकरण होऊ लागल्याने जनावरांची जागा यंत्राने घेतली असली तरी पशूधन किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याचे काम जिल्हा परिषदेचा पशू संवर्धन विभाग करीत आहे. मागच्या वर्षापर्यंत पशू वैद्यकीय दवाखान्यासंदर्भात जे शेतकरी नाक मुरडत होते. आता तेच शेतकरी येथील सेवांमुळे वर्षभरातच खुश झाले आहेत. शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा देण्यात यशस्वी ठरलेल्या जिल्ह्यातील श्रेणी १ च्या १५ पशू वैद्यकीय दवाखान्यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के लोक शेतीवर निर्भर आहेत. शेतीवर निर्भर असलेले लोक शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशू पालन करतात. त्या पशूंचे संवर्धन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांना मदत केली जाते. परंतु पाहीजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना डांग्या व घटसर्प असे विविध आजार होतात. त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सोबतच जनावरांना कत्तलीसाठी रवाना केले जात असल्याने जनावरांच्या संख्येत घट होत आहे. या सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत करून शेतकºयांच्या पशूंचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यातील ७२ ठिकाणी उघडण्यात आलेले दवाखाने आजही जनावरांना संपूर्ण सेवा देण्यासाठी अपयशी ठरत आहेत.
गोंदिया जिल्हा परिषदेत जिल्हा पशू संवर्धन अधिकारी म्हणून वर्षभरापासून रूजू झालेले डॉ. राजेश वासनिक यांनी जिल्ह्यातील पशू वैद्यकीय दवाखान्यांची हालत दुरूस्त करण्याचा विडा उचलला. त्यांनी सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून आपापले दवाखाने उत्तम कसे करता येईल यावर भर दिला. याचाच परिपाक म्हणून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १५ पशू वैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ’ प्रमाणित झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात श्रेणी १ चे ४२ पशू वैद्यकीय दवाखाने तर श्रेणी २ चे ३० पशू वैद्यकीय दवाखाने आहेत.
हे पशू वैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ’
गोंदिया जिल्ह्यात श्रेणी १ चे ४२ दवाखाने असून यातील १५ दवाखाने ‘आयएसओ’ झाले आहेत. तर श्रेणी १ चे २७ व श्रेणी २ चे ३० दवाखाने दवाखाने तसेच पडून आहेत. परंतु त्या दवाखान्यांच्या उद्धारासाठी येथील डॉक्टरांमध्ये तळमळ दिसून येत नाही. आयएसओ झालेल्या दवाखान्यांमध्ये पांढराबोडी, कारंजा, कामठा, देवरी, आसोली, दासगाव, साखरीटोला, गोऱ्हे, विचारपूर, पुराडा, कडीकसा, कुºहाडी, चोपा, चिरचाळबांध व घाट्टेमणी यांचा समावेश आहे.
लोकांच्याच खिशाला कात्री
पशू वैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्यासाठी त्या दवाखान्याला सुसज्ज करणे आवश्यक असते. त्या दवाखान्यात ज्या-ज्या गोष्टींची गरज आहे त्या-त्या गोष्टी पुरविणे आवश्यक आहे. शासन एकीकडे आयएसओ करा अशी ताकीद संबधीत यंत्रणेला देते. परंतु आयएसओ करण्यासाठी त्या दवाखान्यांना गरज असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे देत नाही. लोकवर्गणी करा किंवा पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांने स्वत:च्या खिशातील पैसे टाका आम्हाला माहिती नाही. फक्त दवाखाने आयएसओ झाले पाहिजे या सुत्रामुळे डॉक्टरांनी लोकांच्या खिशाला कात्री लावून हे दवाखाने सुसज्ज केले. डिजीटल शाळांसारखीच स्थिती आयएसओ पशू वैद्यकीय दवाखान्यांची आहे.