जिल्ह्यात कोरोनाचे १५ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:00 AM2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:27+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात जिल्हा आणि आरोग्य प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांकडून सुध्दा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून रुग्ण संख्येत दररोज वाढ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येत सुध्दा वाढ होत आहे. मागील आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.२४) गोंदिया येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा १५ वा बळी गेला आहे. तर ४५ नवीन कोरोना बाधितांची भर पडली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात जिल्हा आणि आरोग्य प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांकडून सुध्दा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याने जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून रुग्ण संख्येत दररोज वाढ होत आहे. गोंदिया शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने गोंदिया शहर आता कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे. सोमवारी आढळलेल्या एकूण ४५ कोरोना बाधितांमध्ये ४० कोरोना बाधित रुग्ण हे गोंदिया शहरातील आहेत. त्यामुळे शहरवासीयांना आता काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याची गरज आहे. सोमवारी गोंदिया येथील एका ६२ वर्षीय व्यक्तीचा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा १५ वर पोहचला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गोंदिया प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण १४ हजार २७८ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी २८९ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले तर १२ हजार ८५७ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या १०५९ वर पोहचली आहे.८१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. तर ४१० स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. जिल्ह्यातील ७५६ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
८६४० जणांची अँटीजेन रॅपिड टेस्ट
कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ८६४० व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले. यामध्ये ८४०४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २३६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलिगकरण कक्षात ७५ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ९०१ व्यक्ती अशा एकूण ९७६ व्यक्ती विलगिकरणात आहेत.
आमगाव व देवरी पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव
देवरी पोलीस स्टेशनमधील एक अधिकारी सोमवारी (दि.२४) कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.पोलीस स्टेशनचे सॅनिटायझेशन करण्यात आले. आमगाव पोलीस स्टेशनमधील सुध्दा एक पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह आला असून त्यांना गोंदिया येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.