मानव विकासच्या बसेसने दिले १.५० कोटीचे उत्पन्न
By Admin | Published: February 23, 2016 02:21 AM2016-02-23T02:21:45+5:302016-02-23T02:21:45+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावांपासून शाळेपर्यंत पोहोचवून परत आणण्यासाठी शासनाने मानव विकास
गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावांपासून शाळेपर्यंत पोहोचवून परत आणण्यासाठी शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत ‘स्कूल बस’ ची सोय केली. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण २८ बसेस असून एप्रिल २०१५ ते आतापर्यंत साडेदहा महिन्यात या बसेसद्वारे एक कोटी ५० लाख ९६ हजार ९१६ रूपयांचे उत्पन्न गोंदिया आगाराला मिळाले आहे.
जिल्हाभरात मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण ५६ बसेस धावतात. यापैकी गोंदिया आगारात एकूण २८ बसेस आहेत. सप्टेंबर महिन्यापूर्वी गोंदिया आगारात केवळ २६ बसेस होत्या. सप्टेंबर महिन्यात दोन बसेस मिळाल्याने मानव विकासच्या बसेसची संख्या २८ पर्यंत पोहोचली आहे. मानव विकास कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोंदिया आगाराला एकूण २० बसेस मिळाल्या होत्या. गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या चार तालुक्यांसाठी प्रत्येकी पाच बसेस मिळाल्या होत्या. आता त्यात पुन्हा आठ बसेस भर पडल्याने प्रत्येक तालुक्यासाठी सात स्कूल बसेसची सोय झाली आहे.
गोंदिया आगारातील मानव विकासच्या स्कूल बसेस एप्रिल २०१५ ते फेब्रुवारीच्या आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी पाच लाख ३७ हजार ७१६ किमी (८१३ फेऱ्या) धावल्या. त्याद्वारे ३१ लाख ४९ हजार ०८१ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर शाळांव्यतिरिक्त (लिंक) या स्कूल बसेसने सात लाख ८३ हजार ११६ किमीचा (९९६ फेऱ्या) प्रवास केला. त्याद्वारे एक कोटी १९ लाख ४७ हजार ८३५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
अशाप्रकारे मानव विकासच्या २८ स्कूल बसेसने एकूण १३ लाख २० हजार ८३२ किमी प्रवास करून एकूण एक कोटी ५० लाख ९६ हजार ९१६ रूपयांचे उत्पन्न मिळवून दिले.
१५ एप्रिलनंतर स्कूल बसेस प्रवासी सेवेत
४आठवी, नववी व अकरावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर मानव विकासच्या स्कूल बसेस प्रवासी सेवेसाठी धावणार आहेत. १५ एप्रिलपूर्वी शैक्षणिक सत्रातील स्कूल बसेस २१५ दिवस धावण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. यानंतर या बसेसला रिकाम्या उभ्या ठेवता येत नाही. त्यामुळे या स्कूल बसेस १५ एप्रिलनंतर प्रवासी सेवेत लावण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.