सहा गावातील १५० शेतकऱ्यांचा ७ तास तहसील कार्यालयात ठिय्या
By नरेश रहिले | Published: August 29, 2022 11:58 PM2022-08-29T23:58:43+5:302022-08-29T23:58:51+5:30
१० हजार क्विंटल धान ऑनलाईन झालेच नव्हते : दोन दिवसात तिढा सोडविण्याचे मार्केटींग अधिकाऱ्याचे आश्वासन
नरेश रहिले
गोंदिया: आमगाव तालुक्यातील सहा गावातील नागरिकांनी मे महिन्यात धान खरेदी केंद्रावर धान विकले. मात्र त्यांचे धान ऑनलाईन न झाल्यामुळे त्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. परिणामी संतप्त असलेल्या दिडशे शेतकऱ्यांनी २९ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. तब्बल सात तास शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून तहसील कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा दिला होता. परिणामी मार्केटींग अधिकाऱ्यांनी आमगाव गाठून शेतकऱ्यांची समस्या ऐकूण घेत त्यांच्या समस्याचे समाधान केले. अवघ्या दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याचे आश्वासन दिले.
आमगाव तालुक्याच्या किडंगीपार, बोथली, जवरी, नवेगाव, कालीमाटी व भजीयापार या सहा गावातील शेतकऱ्यांचे १० हजार क्विनटल धान खरेदी करण्यात आले. परंतु त्यांचे धान ऑनलाईन न झाल्यामुळे त्यांना धानाचे चुकारे मिळाले नाहीत. सतत त्यांचे धान घेण्यासंदर्भात टाळाटाळ होत असतांना शेतकऱ्यांनी हकत्र येत तहसील कार्यालयावर आंदोलन केले. दुपारी १ वाजता नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाला सुरूवात केली. जेव्हापर्यंत तोडगा निघणार नाही तेव्हापर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेण्यात आली. सायंकाळी ५ वाजूनही तहसीलदार न आल्यामुळे लोकांचा आक्रोश वाढत होता. पोलीस यंत्रणाही तहसील कार्यालयात सज्ज झाली. परिणामी सायंकाळी दाखल झालेल्या तहसीलदार यांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी यांना फोन करून आमगावला बोलावले. आमगावला मार्केटींग अधिकारी मनोज बाजपेयी गेल्यानंतर तेथे सकारात्मक चर्चा झाली. परिणामी त्या शेतकऱ्यांचे खरेदी केलेले धान दोन दिवसात ऑनलाईन करण्याचे आश्वासन बाजपेयी यांनी दिले. सायंकाळी ७ वाजता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन घरची रस्ता धरली.
शेतकऱ्यांचे धान ऑनलाईन न झाल्यामुळे सहा गावातील लोकांनी तहसील कार्यालयात आंदोलन केले. आता त्यांचे धान दोन दिवसात ऑनलाईन होतील. यावर सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांचे धान नजीकच्या केंद्रातच ऑनलाईन होणार आहेत.
- मनोज बाजपेयी, मार्केटींग अधिकारी गोंदिया.