गोंदियात देहविक्री करणाऱ्या १५० महिलांना मिळणार २६ लाखांची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:27 PM2020-12-12T12:27:20+5:302020-12-12T12:29:34+5:30
Gondia News गोंदिया जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या १५० महिलांना ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याचे पैसे मदत म्हणून दिले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या १५० महिलांना ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याचे पैसे मदत म्हणून दिले जाणार आहे. ५ हजार रुपये महिन्याप्रमाणे तीन महिन्याचे १५ हजार रुपये प्रत्येक देहव्यवसाय करणाऱ्या त्या महिलांना मिळणार आहे. ५४ महिलांची मुले शाळेत जात असल्यामुळे मुलांचे अडीच हजार रुपये महिना प्रमाणे तीन महिन्याचे ७ हजार ५०० रुपये मुलांचे म्हणून त्या महिलांना दिले जाणार आहे.
कोरोनामुळे देहव्यवसाय करणाऱ्या महिलांचा व्यवसाय बुडाला त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले म्हणून सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. क्रिमीनल अपिल क्र.१३५/२०१० (बुधादेव करमास्कर विरुध्द स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल व इतर) मधील आदेशानुसार वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-१९ च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत, आदेश पारीत करण्यात आला. या आदेशावरून गोंदिया जिल्ह्यातील किती महिला देहव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात याची माहिती गोंदियातील एका सामाजिक संस्थेने घेतली. यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्या महिलांना ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याचे प्रत्येक महिन्याला ५ हजार रूपयांप्रमाणे तीन महिन्याचे १५ हजार रुपये एका महिलेला दिले जाणार आहेत. ५४ महिलांचे मुले शाळेत जात असल्याने त्यांच्या मुलांसाठी १२ लाख १५ हजार, तर महिलांना १४ लाख ४० हजार असे एकूण २६ लाख ५५ हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी तुषार पवनीकर यांनी दिली.