एनआरएचएमच्या १५ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
By admin | Published: August 3, 2016 12:13 AM2016-08-03T00:13:43+5:302016-08-03T00:13:43+5:30
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत १५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित भविष्याला घेवून चिंता सतावत आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत १५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित भविष्याला घेवून चिंता सतावत आहे. यापैकी आशा कार्यकर्ती सोडून गोंदिया जिल्ह्यातील ५९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक (तांत्रिक) द्वारे ३१ मार्च २०१७ नंतर प्रतिनियुक्ती समाप्त करण्याच्या आदेशाने जिल्ह्यासह राज्यभरात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश आहे.
सन २००५ पासून कार्यान्वित राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रथम चरण सन २०१२ मध्ये पूर्ण झाले होते. यानंतर १ एप्रिल २०१२ पासून सुरू झालेले दुसरे चरण ३१ मार्च २०१७ रोजी समाप्त होत आहे. यानंतर अभियान सुरू राहील किंवा नाही, या संदर्भात केंद्र शासनाकडून आतापर्यंत कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य/परिमंडळ/जिल्हा/तालुकास्तरावर मोठ्या संख्येत कंत्राटी पद्धतीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे काम कंत्राटी काळात समाधानकारक आढळले व त्यांना ११ महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत अभियान सुरू राहण्यासंदर्भात सहसंचालक (तांत्रिक) द्वारे राज्याच्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र प्राचार्य, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदींना पत्राच्या माध्यमातून सूचित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ४५ वर्षांच्या जवळ पोहोचली आहे. त्यांच्यावर आपल्या कुटुंबाच्या पालन-पोषण, आरोग्य व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. अभियान बंद झाल्यावर सर्व कर्मचारी बेरोजगार होतील.
यात विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक ८, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ३४, जिल्हा लेखा व्यवस्थापक ३४, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी ४२, आयपीएचएस ३४, डाटा एंट्री आॅपरेटर/कार्यक्रम सहायक ७५०, लेखापाल ७५०, कार्यक्रम अधिकारी ३५०, एएनएम ५ हजार, स्टॉफ नर्स १,३५०, एचएचव्ही ६७०, प्रयोगशाळा तज्ज्ञ ६८०, विविध तज्ज्ञ ७५०, सांख्यिकी अन्वेषक १५०, अभियंता ४५०, औषध निर्माण अधिकारी १,१५०, तालुका समूह संघटक ३६०, एडीओ मेट्रिशियन २३, बजेट वित्त अधिकारी ३९, क्लर्क ५५ व चतुर्थ श्रेणी ड्रेसर ५११ यांचा समावेश आहे.