तालुक्यात ७४ जागांसाठी १५७ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:06+5:302021-01-09T04:24:06+5:30
विजय मानकर सालेकसा : येत्या १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण ७४ जागांवर आपले नशीब आजमावण्यासाठी १५७ ...
विजय मानकर
सालेकसा : येत्या १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण ७४ जागांवर आपले नशीब आजमावण्यासाठी १५७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच ठिकाणी दुहेरी लढत होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील एकूण ४० पैकी ९ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर निवडणुका घेण्यात येत आहेत. यात मुंडीपार, पाऊलदौना, मानागड, कावराबांध, पोवारीटोला, कोटजंभोरा, कारुटोला, सातगाव आणि कोटरा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या नऊ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ३० प्रभागांचा समावेश आहे. काही प्रभागांत दोन, तर काही प्रभागांत प्रत्येकी तीन सदस्य निवडून जाणार आहेत. तीन ग्रामपंचायती कावराबांध, कारुटोला आणि मुंडीपार या ११ सदस्यीय असून यामध्ये प्रत्येकी चार-चार प्रभागांचा समावेश आहे, तर पाऊलदौना, सातगाव आणि कोटरा या ग्रामपंचायतींत प्रत्येकी नऊ सदस्य असून तीन-तीन प्रभागांमध्ये विभाजित केलेल्या आहेत. पोवारीटोला, कोटजंभोरा आणि मानागड या ग्रामपंचायतींत प्रत्येकी सात सदस्यीय असून तीन-तीन प्रभागांची रचना केलेली आहे.
नऊ ग्रामपंचायतींत ३० वॉर्डातील ८१ सदस्यांसाठी एकूण १९५ लोकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी तीन अर्ज अवैध ठरले व १९२ अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यामधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४ जानेवारीला एकूण २८ उमेदवारांनी माघार घेतली तेव्हा १६४ उमेदवारांपैकी सात उमेदवारांच्या विरुद्ध कोणी उमेदवार नसल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. आता ८१ पैकी ७४ जागांवर ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक होणार आहे. यासाठी एकूण १५७ उमेदवार रिंगणात आहेत. यात ८७ महिला उमेदवार, तर ७० पुरुष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
बॉक्स
पाच महिला, दोन पुरुष बिनविरोध
तालुक्यात एकूण सात उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये पाच महिला आणि दोन पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. ग्रामपंचायत पाऊलदौना येथील प्रभाग क्र. ३ मधून भरत छबीलाल वट्टी, मानागड ग्रामपंचायतमधील प्रभाग क्र.१ मधून भिमला अमरलाल पुसाम, वनिता वितेश सिरसाम, प्रभाग क्र.२ मधून राजेश नंदलाल अडमे, कोटजंभोरा ग्रामपंचायतमधून प्रभाग क्र.१ मधील सुषमा भोजराज माहुले आणि कल्पना राजू वैद्य, कोटरा ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र.१ मधून भाग्यश्री खोविंद वरखडे या उमेदवारांचा समावेश आहे.
.....
अशी होणार लढत
मुंडीपार ग्रामपंचायतमध्ये तीन प्रभागांतून ११ सदस्य निवडून देण्यासाठी एकूण २२ उमेदवार मैदानात उतरले आहेत. यात १२ महिला आणि १० पुरुष उमेदवार आहेत. नऊ सदस्यीय पाऊलदौना ग्रामपंचायतीमध्ये एकूण १८ उमेदवार मैदानात असून यात १० महिला आणि ८ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. सर्वांत मोठी ग्रामपंचायत कावराबांध येथे ११ सदस्य निवडून जाण्यासाठी २२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रत्येक ठिकाणी अटीतटीचा सामना होताना दिसून येत आहे. मानागड ग्रामपंचायतमध्ये सात सदस्यांपैकी तिघे बिनविरोध निवडून आले असून चार सदस्यांसाठी आठ उमेदवार आपले नसीब आजमावत आहेत.