मालवाहतुकीतून आगारांना १६ लाखांचे उत्पन्न, चालकांना मात्र भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:32+5:302021-05-29T04:22:32+5:30

गोंदिया : कोरोनामुळे मागील वर्षी लॉकडाऊन लागले व तेव्हा राज्य मार्ग परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसला होता. अशात हे ...

16 lakh income from freight depots, but poor to drivers | मालवाहतुकीतून आगारांना १६ लाखांचे उत्पन्न, चालकांना मात्र भुर्दंड

मालवाहतुकीतून आगारांना १६ लाखांचे उत्पन्न, चालकांना मात्र भुर्दंड

Next

गोंदिया : कोरोनामुळे मागील वर्षी लॉकडाऊन लागले व तेव्हा राज्य मार्ग परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसला होता. अशात हे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग राज्यात सुरू केला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या आगारांनीही मालवाहतूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीप्रमाणेच यंदाही लॉकडाऊनमुळे नागरिकांनी प्रवास टाळला असून, एसटी स्थानकातच उभ्या आहेत. परिणामी आगारांचे उत्पन्न शून्यावरच आले आहे. अशात आगारांकडून पुन्हा मालवाहतुकीवर जोर दिला जात आहे. यात मात्र चालकांना चांगलाच भुर्दंड बसताना दिसत आहे. त्याचे असे की, मालवाहतुकीचा ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला संबंधित आगारात २ दिवस राहावे लागते. यासाठी मात्र त्याला त्याच्या खाण्या-पिण्याच्या खर्च स्वत:च करावा लागतो. म्हणजेच, मालवाहतुकीतून आगार पैसा कमावीत असतानाच चालकांना मात्र स्वखर्चाने आपली व्यवस्था करावी लागत आहे. यामुळे मात्र चालकांमध्ये चांगलीच नाराजी दिसत आहे.

-----------------------------

वाहतूक सुरू असलेले ट्रक- ५

जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक- ५

------------------------

कोरोनाकाळात १६ लाखांची कमाई

जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून, लॉकडाऊनमुळे बसलेला फटका भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग या दोन्ही आगारांमध्ये राबविला जात आहे. अशात गोंदिया आगाराने मागील मे महिन्यापासून आतापर्यंत ११ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे, तर तिरोडा आगाराने आतापर्यंत तीन लाख ७९ हजार ७२ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. म्हणजेच, या दोन्ही आगारांनी वर्षभरात १५ लाख ६९ हजार ७२ रुपयांचे उत्पन्न मालवाहतुकीतून मिळविले आहे.

-------------------------------

नियमानुसार २ दिवसांचा मुक्काम

मालवाहतुकीसाठी ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला नियमानुसार त्या ठिकाणी २ दिवस राहावे लागते व तेथे त्याच्याकडून ड्यूटी करवून घेता येते अशी माहिती आहे. मात्र यासाठी चालकाला १०० रुपये नाइट हॉल्टचे मिळतात, तर त्याला आपल्या खाण्या-पिण्याचा खर्च मात्र आपल्या खिशातूनच करावा लागतो. आता येथे नियमानुसार २ दिवस राहण्याचा विषय असतानाच कित्येकदा आठवडाभर चालकांना सोडले जात नसल्याचे चालकांचे म्हणणे असून, यामुळे त्यांच्यात रोष उत्पन्न होत आहे.

-----------------------------

ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट

मालवाहतुकीसाठी बाहेर जाताना चालकाला ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, दिलेला ॲडव्हान्स त्यांच्या पगारातून पुढे कट केला जातो. म्हणजेच, चालकाला जेथे जायचे आहे तेथे जेवढेही दिवस राहावे लागणार आहे त्याचा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागतो. शिवाय यासाठी २ दिवस त्या चालकाला तेथे थांबविता येणार असल्याचा नियम असल्याची माहिती आहे. मात्र, कित्येकदा चालकांना त्याही पेक्षा जास्त किंवा आठवडाभर सोडले जात नाही. म्हणजेच एवढ्या दिवसांचा भुर्दंड चालकांच्या खिशाला बसतो. यासाठी त्यांना १०० रुपयांनुसार नाइट हॉल्ट मिळत असून, त्यापेक्षा जास्तीचा खर्च सहन करावा लागतो.

-------------------------------

चालक म्हणतात...

१) आम्हाला ड्यूटी करायचीच आहे. मात्र मालवाहतुकीसाठी जात असताना तेथे येणारा खर्च आमच्या खिशातूनच करावा लागतो. अशात कमाई कमी व खर्च जास्त असे होते. शिवाय, तेथे कित्येकदा आठवडाभर थांबवून ठेवले तर आर्थिक फटका बसत असतानाच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

- एक चालक

२) मालवाहतुकीसाठी जाणाऱ्या चालकाला २ दिवसांपेक्षा जास्त थांबवू नये असा नियम आहे. मात्र, तेथे गेल्यावर कित्येकदा त्यापेक्षा कितीतरी जास्त दिवस आम्हाला थांबविले जाते. अशात तेवढा खर्च खिशातून करावा लागतो. शिवाय शारीरिक व मानसिक त्रास वेगळा होतो.

- एक चालक

-----------------------------

मालवाहतुकीसाठी जाणाऱ्या चालकांना नियमानुसार २ दिवसांपेक्षा जास्त दिवस थांबविता येत नाही. मात्र, यात नियम पाळले जात नसून कित्येकदा आठवडाभर चालकांना अडकवून ठेवले जाते. अशात त्यांचा खर्च खिशातूनच करावा लागत असल्याने बाहेर जाणे परवडणारे नसतेच. उलट शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. नियमाचे पालन करण्याची गरज आहे.

- कामगार संघटना

Web Title: 16 lakh income from freight depots, but poor to drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.