१६ ठाण्यातील महिला पोलिसांची कुचंबणा
By admin | Published: March 3, 2016 01:39 AM2016-03-03T01:39:52+5:302016-03-03T01:39:52+5:30
जिल्ह्यात १६ पोलिस ठाणे असून त्यात २० टक्क्यांपेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत. मात्र आतापर्यंत या महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही ठाण्यात स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही.
स्वतंत्र प्रसाधनगृह नाही : मंजुरी मिळूनही निधीअभावी रखडले बांधकाम
नरेश रहिले गोंदिया
जिल्ह्यात १६ पोलिस ठाणे असून त्यात २० टक्क्यांपेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत. मात्र आतापर्यंत या महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही ठाण्यात स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्या ठाण्यांमधील ३६७ महिला पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच कुचंबना होत आहे. मात्र आता ही कुचंबना दूर होण्याचे दिवस जवळ येत आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याला १६ लाख रुपये देण्याचे शासनाने ठरविले आहे. अद्याप तो निधी प्राप्त झालेला नाही.
गोंदिया जिल्ह्यात आमगाव, सालेकसा, देवरी, चिचगड, डुग्गीपार, अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध, केशोरी, गोरेगाव, तिरोडा, दवनीवाडा, गंगाझरी, रामनगर, रावणवाडी, गोंदिया शहर व गोंदिया ग्रामीण असे १६ पोलिस ठाणे आहेत. या १६ पोलिस ठाण्यात २५ ते ३० टक्के महिला कर्मचारी आहेत.
गोंदिया पोलिस दलाच्या आस्थापनेवर ३६७ महिला कर्मचारी व ३ महिला अधिकारी कार्यरत आहेत. गोंदियाच्या पोलिस विभागाने सन २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षात प्रत्येक पोलिस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र विश्रामगृह व प्रसाधनगृह असावे असा प्रस्ताव पोलीस महानिरीक्षकांना मागच्याच (फेबु्रवारी) महिन्यात पाठविला. तो प्रस्ताव शासनाने मंजूरही केल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात १६ लाख रुपये खर्च करुन महिला कर्मचाऱ्यांकरिता प्रसाधनगृह बांधले जाणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत महिलांसाठी स्वतंत्र विश्रामगृह तर सोडाच प्रसाधनगृहसुद्धा नव्हते. पोलीस विभागाला २४ तास नोकरी करावी लागत असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अधिक ताण असतो. रात्र असो वा दिवस, महिला पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही काम करावेच लागते. त्यामुळे स्वतंत्र प्रसाधन गृह व विश्रामगृहाची व्यवस्था करण्यासाठी १६ पोलिस ठाण्याचा २ कोटी ५६ लाखांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
निधी केव्हा मिळणार?
फेबु्रवारी महिन्यात या प्रस्तावाला पोलिस महानिरीक्षकांनी प्रशासकीय मान्यता दिली. परंतु शासनाने अद्याप बांधकामासाठी पैसे दिले नाही. पैसे आल्यानंतर लगेचच गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांमध्ये प्रसाधन व विश्रामगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. हा निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
दुसऱ्यांची सुरक्षा करणाऱ्या महिलाच असुरक्षित
महिलांसाठी आतापर्यंत स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्याने नाईलाजाने पुरूष प्रसाधनगृहाचा वापर करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये संकोच आणि असुरक्षिततेची भावना असते. परंतु पोलीस विभागात शिस्तीच्या दबावाखाली महिलांना ही कुचंबना सहन करावी लागत आहे.
महिलांची कार्यक्षमता वाढीस लागेल
महिला कर्मचाऱ्यांना २४ तास काम करावे लागत असल्यामुळे त्यांना स्वतंत्र विश्रामगृह व प्रसाधनगृह आवश्यक आहे. प्रसाधनगृह झाल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल. निधी मिळताच बांधकामाला सुरूवात होईल.
-सुरेश भवर
पोलीस उपअधीक्षक (गृह), गोंदिया