तालुक्यातील १६ गावे होणार पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:07 PM2018-07-14T21:07:25+5:302018-07-14T21:09:17+5:30
वारंवार येणाऱ्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : वारंवार येणाऱ्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संरक्षित पाणी साठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे.
देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर दिवसरात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली जीवन जगत आहे. शेतकºयांना पीक उत्पादन दुप्पटीने वाढावे म्हणून भुजल पातळीत वाढ करुन सरंक्षीत जलसिंचनात वाढ करण्याच्या दृष्टीने सन २०१५-१६ पासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा उपक्रम हाती घेतला. या अभियानात अर्जुनी मोरगाव तालुक्यात २०१८-१९ मध्ये १६ गावात पाण्याच्या सरंक्षित सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या तालुकास्तरीय समितीने देऊळगाव (बोदरा) अरततोंडी, तिडका (करडगाव), धाबेटेकडी, चापटी, सुकळी (खैरी), चान्ना (बाक्टी), भुरशीटोला, सिरेगाव, कोहलगाव, पांढरवाणी (रैय्यत), निलज, इंजोरी, चुटिया (पळसगाव), संजयनगर, सोमलपूर या १६ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. तालुक्यात पहिल्या वर्षी २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानामध्ये ४ गावांची निवड करण्यात आली होती. सन २०१६-१७ मध्ये ९ गावे, २०१७-१८ मध्ये ७ गावे, २०१८-१९ मध्ये १६ गावांची निवड करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे पाण्याच्या संचित साठ्यामध्ये वाढ होते. गावातील पशुधनाला पिण्यासाठी तसेच शेतीचा संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे. पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकºयांना विविध पिके घेता येणार.
विविध यंत्रणेची कामे
जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावांमध्ये जलसाठा वाढवून पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी जलसंधारण विभाग, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वनविभाग, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गंत जलसंधारणाची विविध कामे करण्यात येणार आहेत.
तालुकास्तरीय समिती
जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या तालुक्यातील १६ गावातील विविध विकासात्मक आराखडे बनवून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या नियंत्रणाखाली समिती कार्यरत राहणार आहे. यामध्ये तहसीलदार, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी, उपविभागीय अभियंता, उपअभियंता जलसंधारण, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांचा समावेश आहे. ही समिती तालुक्याचा आराखडा मंजूर करुन, वेळोवेळी कामाचा आढावा घेणार आहेत.
ही कामे होणार
जलयुक्त शिवार अभियानातील गावामध्ये पाण्याचा ताळेबंद तयार करुन गावात आवश्यक असलेले पिण्याचे पाणी, जनावरांसाठी, शेतीसाठी व पडणारा पाऊस याचा पाण्याचा ताळेबंद तयार करुन रब्बी, खरीप व उन्हाळी पिकांसाठी लागणारे सरंक्षीत, ओलीतासाठी लागणारे पाणी याचा ताळेबंद केला जाणार आहे. निवड झालेल्या गावांमध्ये भातखाचरे, दुरुस्ती, बोळी- तलाव दुरुस्ती, सिमेंट नाला बंधारा बांधणे, जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती, माती नाला बंधाºयामधील गाळ काढणे, नाला खोलीकरण आदी कामांना प्राथमिकता दिली जाणार आहे.
आराखडे तयार
निवड झालेल्या गावांमध्ये प्रस्तावित केलेल्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरु झाले आहे. प्रस्तावित केलेल्या कामाच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेवून सदर कामाचे निविदा काढल्या जाणार आहेत. शेतीचा हंगाम संपल्यानंतर निवड झालेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध कामे सुरू केली जाणार आहे.