जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये १६ टक्के तरुण कारभारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:27 AM2021-01-22T04:27:04+5:302021-01-22T04:27:04+5:30
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. १६९३ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यात ९३० महिला उमेदवार निवडून आल्या, ...
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. १६९३ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यात ९३० महिला उमेदवार निवडून आल्या, तर १८ ते ३० वयोगटातील २५६ उमेदवार निवडून आले असून ५१३ इतर वयाेगटांंतील उमेदवारांचा समावेश आहे. एकूण ग्रामपंचायतींचा विचार केल्यास ६५ टक्के ग्रामपंचायतींवर महिलाराज पाहायला मिळणार आहे. पण, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांंत काही तरुणांनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि ते निवडूनसुद्धा आले. त्यामुळे आता गावाच्या कारभारात तरुणांचा सहभाग पाहायला मिळणार आहे.
.......
सर्वाधिक तरुण उमेदवार गोंदिया तालुक्यात
जिल्ह्यातील सर्वाधिक ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका गोंदिया तालुक्यात पार पडल्या. यात ६० अधिक तरुण उमेदवार निवडून आले आहे. हे उमेदवार साधारणपणे २३ ते ३२ या वयोगटांंतील आहे. काही तरुणांना कुठलाही राजकीय अनुभव नसताना पहिल्यांदा निवडणूक लढवून विजय प्राप्त केला.
.......
उमेदवारांचे व्हिजन
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये गावच्या विकासात तुमची नेमकी काय भूमिका राहील, असा सवाल केला असता त्यांनी ग्रामविकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या प्रत्यक्षात आणून गावाचा विकास साधणार असल्याचे सांगितले.
......
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती : १८९
निवडून आलेले एकूण उमेदवार : १६९३
१८ ते ३२ वयोगटांतील निवडून आलेले उमेदवार : २५६
........
प्रतिक्रिया :
ग्रामसभेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. पण, ग्रामसभांना महिलांची उपस्थिती फारच नगण्य असते. त्यामुळे ग्रामसभांना महिलांची उपस्थिती कशी वाढेल, यासाठी प्रथम प्रयत्न करणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. मिळालेल्या संधीचा पूर्णपणे योग्य उपयोग करणार आहे.
-तीर्थस्वरी पोवळे, युवा ग्रामपंचायत सदस्य
......
१४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना फार महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासनाच्या लोककल्याणकारी योजना गावात राबविण्याला आपले प्राधान्य असेल. प्रथमच निवडून आल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराची प्रक्रिया समजून घेणार आहे.
- बाबादास मेश्राम, युवा सदस्य
......
ग्रामपंचायतीवर निवडून जाण्याची माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या कारभाराची कार्यप्रणाली जाणून घेणार आहे. त्यानंतर शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कशा राबविता येतील, यासाठी प्रयत्न करणार आहे.
- कुणाल पटले, युवा सदस्य