बल्लारशा रेल्वे मार्गावर १६५ किमी विद्युतीकरण
By admin | Published: February 21, 2016 12:57 AM2016-02-21T00:57:25+5:302016-02-21T00:57:25+5:30
बल्लारशा रेल्वे मार्गावर सन २०१२ पासून सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम सन २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.
१०३ किमीचे काम पूर्ण : ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण होण्याची शक्यता
विकास बोरकर गोंदिया
बल्लारशा रेल्वे मार्गावर सन २०१२ पासून सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम सन २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र निश्चित करण्यात आलेल्या २६२ किलोमीटरच्या विद्युतीकरणातील फक्त १६५ किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात यश आले आहे. परिणामी रेल्वे विभागाने विद्युतीकरणाचा कालावधी वाढवून आता सन २०१७ पर्यंत हे काम करण्याची मुभा दिली आहे. तरीही उर्वरित १०३ किमी अंतराचे विद्युतीकरण या कालावधीत पूर्ण होणार काय? याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
विद्युतीकरणाच्या या कामाचे कं त्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. सिकंदराबाद येथून मुख्य परियोजनेचे कामकाज पाहीले जात आहे. गोंदिया रेल्वे स्टेशनवरील काही अभियंतेही या कामावर नजर ठेवून आहेत. हा जुना प्रोजेक्ट असल्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असे असतानाही कामाची गती कमी आहे.
यामुळेच २६२ किमी अंतराच्या विद्युतीकरणाच्या या कामातील फक्त १६५ किमी अंतराचेच विद्युतीकरण झाले आहे. गोंदिया ते आलेवाहीपर्यंतचे विद्युतीकरण झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात प्रोजेक्ट कार्यालयातील कार्यरत अभियंता एस.एम.शरीफ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला.
असा होणार लाभ
विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यास गाड्यांमध्ये बोगींची संख्या वाढणे शक्य आहे. म्हणजेच या मार्गावर गाडी जास्त भार वहन करू शकणार आहे. याशिवाय काही लांब पल्ल्याच्या गाडयांना गोंदियात पॉवर चेंज (इंजिन बदल) करावा लागत होता तो नंतर करावा लागणार नाही.
दुसरी लाईन टाकणे गरजेचे
विद्युतीकरणाचा थोडा फायदा असला तरी खूप जास्त फायदा होणार असल्याचे दिसून येत नाही. खऱ्या अर्थाने या मार्गावर लाभ देण्यासाठी दुसरी लाईन टाकणे गरजेचे आहे. मात्र रेल्वे विभागाने त्याकडे अद्याप फारसे लक्ष दिलेले नाही. येथे दुसरी लाईन टाकल्यास गाड्यांच्या संख्येत वाढ करणे शक्य होणार आहे.
अहीर यांच्याकडून दबाव
चंद्रपूरचे खासदार तथा केंद्र शासनात मंत्री असलेल्या हंसराज अहिर यांच्या मतदार संघात या रेल्वे लाईनचा काही भाग येतो. त्यांनी या कामाला लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभागावर चांगलाच दबाव बनविल्याची माहिती आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही भाग या रेल्वेमार्गात येतो. रेल्वे विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्चनंतर बल्लारशापासून गोंदियाच्या दिशेने विद्युतीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे.