जिल्ह्यातील १६८ विद्यार्थ्यांनी घेतला ‘मोकळा श्वास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:32 AM2021-08-28T04:32:27+5:302021-08-28T04:32:27+5:30
गोंदिया : शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू आहे. समग्र शिक्षणांतर्गत ‘मोकळा श्वास’ ...
गोंदिया : शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू आहे. समग्र शिक्षणांतर्गत ‘मोकळा श्वास’ नावीन्यपूर्ण उपक्रम अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या इतर सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी बालरक्षक विभाग, समग्र शिक्षा जि. प. गोंदिया अंतर्गत मुलांच्या विचारांना चालना देण्यासाठी ‘मोकळा श्वास’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १६८ विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतला आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्यामध्ये भाषण कौशल्य विकसित करणे, शब्दांच्या उच्चारण्यातून विचार, भावना व्यक्त करण्याची संधी देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थी या विषयासंबंधित पुस्तकांचे वाचन करतील आणि त्यातूनच त्यांच्या ज्ञानात भर पडेल. या उपक्रमामध्ये तीन गट निर्माण केले आहे. प्रत्येक गटाला विषय दिला आहे. इयत्ता १ ली ते ५ वी करिता गट क्रमांक १ असून विषय - मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व, इयत्ता ६ वी ते ८ वी गट क्रमांक २ असून विषय - मुलींच्या शिक्षणाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर, इयत्ता ९ वी ते १२ वी गट क्रमांक ३ असून विषय - स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची स्थिती, शाळाबाह्य बालकांच्या समस्या व उपाय या विषयावर तालुक्याकडून उत्कृष्ट व्हिडीओ जिल्हास्तरावर मागवण्यात आले. या उपक्रमामध्ये इयत्तानुसार व विषयानुसार विद्यार्थ्यांचे तालुक्यातून प्रत्येक गटनिहाय २ उत्कृष्ट मनोगतांचे व्हिडीओ (५ मिनिटांच्या मर्यादेत) जिल्हास्तरावर मागविण्यात आले होते. या उपक्रमांत सहभागी झालेल्या १६८ बालकांनी मोकळा श्वास या कार्यक्रमाचा अनुभव घेतला.