गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने १७ कोटींचे नुकसान; पुरात वाहून ७ तर वीज पडून ५ जणांचा मृत्यू
By नरेश रहिले | Published: September 21, 2022 03:23 PM2022-09-21T15:23:52+5:302022-09-21T16:05:45+5:30
९ हजार २२५ घरे, गोठ्यांचे नुकसान
गोंदिया : यंदा १ जून ते ३१ ऑगस्ट २०२२ या काळात आलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील १७ कोटी ३६ लाख ७३ हजार २५० रुपयांचे नुकसान केले. यात मनुष्य प्राणहानी, जनावरांचा मृत्यू, गोठे व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने सानुग्रह मदत करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पुरात वाहून ७ जणांचा तर वीज पडून यंदा ५ जणांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील ९७४ कुटुंबे बाधित झाली. मनुष्य हानीकरीता ४८ लाख १७ हजार २०० रुपये, जनावरे हानीकरीता २० लाख २३ हजार २५० रुपये, घर, गोठे यांच्या हानीकरीता १५ कोटी ८६ लाख ३२ हजार ८०० रुपये तर बाधित व्यक्तींकरीता ८२ लाख असे एकूण १७ कोटी ३६ लाख ७३ जार २५० रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
पावसामुळे १२ जणांचा मृत्यू
पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहेत. यातील १६ प्रकरणे जिल्हा प्रशासनाने पात्र केली आहेत. यातील १५ जणांना ४४ लाख १७ हजार २०० रूपयाची मदतही देण्यात आली आहे.
७४ जनावरांचा मृत्यू
अतिवृष्टीमुळे ७४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात मोठी दुधाळू जनावरे ३१, लहान दुधाळू जनावरे १८, ओढा काम करणारी मोठी जनावरे १४ तर ओढा काम करणारी लहान जनावरे ११ मृत पावली आहेत. यात मृत जनावरांच्या मालकाला सानुग्रह राशी म्हणून २० लाख २३ हजार २५० रुपये देण्यात येणार आहेत.
९२२५ घर, गोठ्यांचे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात पावसाने ११९ घरे जमीनदोस्त झालीत. ७ हजार २८८ घरांची अंशत: पडझड तर बााधीत सलेल्या १८१८ गोठ्यांची पडझड झाली आहे. यांना मदतीपोटी १५ कोटी ८६ लाख ३२ हजार ८०० रुपये सानुग्रह राशी दिली जाणार आहे.