नक्षलग्रस्त भागात होणार १७ मोबाईल टॉवर्स
By Admin | Published: September 13, 2014 02:00 AM2014-09-13T02:00:34+5:302014-09-13T02:00:34+5:30
जिल्ह्यातील नक्षलप्रभावित व अतिसंवेदनशील क्षेत्रात १७ मोबाईल टॉवर लावण्यात येणार आहेत.
देवानंद शहारे गोंदिया
जिल्ह्यातील नक्षलप्रभावित व अतिसंवेदनशील क्षेत्रात १७ मोबाईल टॉवर लावण्यात येणार आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून याबाबतचे पत्र पाठवून सदर मोबाईल टॉवर लावण्यासाठी साधन साहित्य उपलब्ध केले जात असल्याची माहिती बीएसएनएलला कळविण्यात आली आहे.
दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नक्षलप्रभावित क्षेत्र असलेल्या देवरी, आमगाव, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव तालुक्यात हे मोबाईल टॉवर्स लावण्याचे कार्य लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या गावांत हे टॉवर्स लावण्यात येणार आहेत, त्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व दूरसंचार विभागाचे विभागीय उपव्यवस्थापक एस.एन. हेडाऊ तसेच इतर अधिकाऱ्यांची या संदर्भात नुकतीच एक बैठकही पार पडली.
संवेदनशील क्षेत्रातील नक्षल्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या मोबाईल टॉवर्सचा उपयोग केला जावू शकतो. नक्षलवाद्यांचे मोठे नेटवर्क व त्यांच्या हालचाली बघता केंद्र शासनाकडून हे पाऊल उचलले जात आहे. अतिदुर्गम व जंगल-पहाडांमध्ये असलेल्या क्षेत्रात, जेथे नक्षल्यांच्या अधिक हालचाली होतात, तेथे आपले नेटवर्क मोठे करण्याच्या उद्देशाने शासनाकडून आता सदर पुढाकार घेतला जात आहे.
नक्षलग्रस्त क्षेत्रात १७ टॉवर्स लावण्याचा प्रस्ताव तर आहेच, याशिवाय जिल्ह्यातील काही शहरी व ग्रामीण भागासाठी पुन्हा १० मोबाईल टॉवर्स लावण्याचा प्रस्ताव असल्याचे संबंधितांनी सांगितले. मात्र ते कधीपर्यंत लावले जातील याचा निश्चित कालावधी मात्र सध्या कुणालाही ठाऊक नाही.
सध्या जिल्ह्यात एकूण ९८ मोबाईल टॉवर्स आहेत. या टॉवर्सवरून जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईल सेवा पुरविली जाते. मात्र अनेक ठिकाणी बीएसएनएलची सेवाच वारंवार ठप्प होत असल्याचे दिसून येत आहे.