रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! सणासुदीच्या काळात 'या' मार्गावरील तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 12:01 PM2023-08-25T12:01:43+5:302023-08-25T12:06:10+5:30
तासन्तास उशिरा धावतात गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण
गोंदिया : सध्या सणासुदीचे दिवस असून, या कालावधीत बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. पण रेल्वे विभागाने याच कालावधीत हावडा-मुंबई मार्गावरील दहा ते बारा दिवसांसाठी तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.
रेल्वे विभागाने पुन्हा १७ रेल्वेगाड्या पुढील दहा ते बारा दिवस रद्द केल्या आहेत. यात रायपूर-डोंगरगढ रेल्वे २३ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत, डोंगरगढ-रायपूर ३ सप्टेंबरपर्यंत, इतवारी-बालाघाट २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, बालाघाट-इतवारी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, कटंगी-गोंदिया २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, गोंदिया-कटंगी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, गोंदिया-वडसा २३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, वडसा-चांदाफोर्ट २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर, चांदाफोर्ट-गोंदिया २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर, रायपूर-डोंगरगढ २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, डोंगरगढ-गोंदिया २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, गोंदिया-रायपूर २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, डोंगरगढ-रायपूर २६ ऑगस्ट, रायपूर-इतवारी २५ ऑगस्ट, इतवारी-रायपूर रेल्वे २६ ऑगस्ट रोजी रद्द राहणार आहे.
कोरोनानंतर बिघडलेले रेल्वेचे वेळापत्रक अजूनही तसेच आहे. काही महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे रोको आंदोलन केले होते. याची दखल या क्षेत्राच्या खासदारांनाही घ्यावी लागली. खासदारांनी रेल्वे सुरळीत धावतील, याकडे रेल्वेने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यावेळी केल्या होत्या. या सूचनेनुसार, चार-आठ दिवस रेल्वे सुरळीत धावू लागल्या. प्रवाशांना आनंद झाला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. अल्पावधीतच रेल्वे विभागाने आपले पूर्वीचे दिवस आणले. अजूनही तेच दिवस सुरूच आहेत.
एक्स्प्रेस असो वा सुपरफास्ट सर्वच गाड्या लेट
एक्स्प्रेस, सुपरफास्ट, मेल असो वा लोकल सर्वच गाड्या पाच-सहा तासांपेक्षाही अधिक तास उशिरा धावत आहेत. देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली हा सारा प्रकार सुरू आहे. गुरुवारी (दि. २४) रेल्वेच्या लेटलतीफपणाचा चांगलाच फटका प्रवाशांना बसला. गोंदियाला सकाळी ८.१५ वाजता पोहोचण्याची वेळ असलेली बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस (क्र. १२८५६) दुपारी १२.११ वाजता पोहोचली. सकाळी ९.५२ वाजता पोहोचणारी इतवारी-रायपूर स्पेशल (क्र. ०८२६८) दुपारी १.५० वाजता गोंदिया स्थानकावर पोहोचली. सकाळी १०.४८ वाजता गोंदिया स्थानकावर पोहोचणारी रायगड-गोंडवाना एक्स्प्रेस (क्र. १२४१०) दुपारी १.१९ वाजता पोहोचली. नागपूरकडून रायपूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुन्हा बिघडले असून, गेल्या आठवडाभरापासून तासन्तास गाड्या उशिरा धावत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.