अतिदक्षता कक्षात १७० नवजातांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 09:18 PM2019-06-02T21:18:15+5:302019-06-02T21:19:32+5:30
शासन माता व बाल मृत्यूवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करीत असले तरी बालमृत्यूचे तांडव थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी उत्कृष्ट असे नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आले आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासन माता व बाल मृत्यूवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करीत असले तरी बालमृत्यूचे तांडव थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी उत्कृष्ट असे नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आले आहे. तरीही या कक्षात वर्षभरात १७० बालकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार ८३० बालकांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यासाठी एकमेव असलेल्या बाई गंगाबाई महिला रूग्णालयात वर्षाकाठी नऊ हजार महिलांची प्रसूती होते. मनुष्यबळ अभावी येथील डॉक्टरांवर कामाचा ताण असतो. नवजात अतिदक्षता कक्षात बालरोग तज्ज्ञ नसल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात दोन हजार नवजात बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी एक हजार ८३० बालकांवर उपचार केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र १७० बालकांवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
यात ७०० ग्रॅम व त्यापेक्षा कमी वजन असलेल्या २० बालकांचा मृत्यू झाला. एक किलो वजनापेक्षा कमी २५ बालकांचा, दोन किलो पेक्षा कमी वजनाच्या २५ बालकांचा, गर्भातच व्यंगत्व आल्यामुळे ५० बालकांचा तर इंफेक्शनमुळे ५० बालकांचा मृत्यू झाला आहे. या दोन हजार बालकांच्या मातांपैकी ४६७ मातांची प्रसूती गंगाबाईत झाली नसून बाहेर प्रसूती झाल्यानंतर त्यांच्या बाळांना उपचारासाठी गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणण्यात आले होते. गंगाबाईत दाखल झालेल्या बालकांपैकी ८.२ टक्के बालकांचा मृत्यू होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.
व्यंगत्वामुळे सर्वाधिक बालकांचा मृत्यू
आईच्या गर्भातच अर्भकाची वाढ व्हावी यासाठी त्यांना संतुलीत आहार देणे आवश्यक असते. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला व विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु गर्भावस्थेत गर्भवतींकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे हृदयविकार, फुफुसाचे व्यंगत्व, मेंदू व किडणी यांच्यात व्यंगत्व येते. व्यंगत्व व इंफेक्शनमुळे समान मृत्यू होण्याचा दर मागील वर्षीची आकडेवारी दाखविते.
तीन व्हेंटिलेर बंदच
गंगाबाई स्त्री रूग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात चार व्हेंटीलेटरची गरज आहेत. परंतु सद्यस्थितीत फक्त एकच व्हेंटीलेटर सुरू आहे. तीन व्हेंटीलेटर बंद आहेत. त्यामुळे नवजात बालकांचा उपचार करण्याची अडचण येत असून त्यामुळे चिमुलकल्यांचा मृत्यू तर होत नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.
व्यवस्था ३२ ची ठेवतात ५० रूग्ण
नवजात अतिदक्षता कक्षात ३२ बालके एकासोबत दाखल राहू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु ३२ बालकांचीच व्यवस्था असताना गंगाबाईतील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहता एकाच वेळी आजघडीला ५० चिमुकल्यांवर उपचार करण्यात येतो. बालरोग विभाग ४० बेडचा आहे. परंतु त्या ठिकाणीही हीच अवस्था आहे.