सहा दिवसांत गोंदिया जिल्ह्यात १८ टक्के पाऊस; सरासरी ४१४ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 09:46 PM2022-07-06T21:46:09+5:302022-07-06T21:46:43+5:30
Gondia News जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
गोंदिया : जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दगा दिला, तर सरासरीच्या केवळ ९ टक्केच पाऊस ३० जूनपर्यंत झाला होता. त्यामुळे केलेल्या पेरण्या संकटात आल्याने बळीराजा चिंतातुर होता, पण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात सहा दिवसांच्या कालावधीत १८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १,१५० मिमी पाऊस पडतो. एवढा पाऊस हा धानाच्या शेतीसाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धान लागवडीचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. हवामान विभागाने यंदा सुरुवातीला दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता, पण हवामान विभागाचे हे सर्व अंदाज फोल ठरले. जून महिन्यात सरासरीच्या केवळ ९ टक्केच पाऊस झाला हाेता. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत होती, तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी रोवणीला सुरुवात केली होती, पण पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जिल्ह्यावासीयांना दिलासा दिला. मागील दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे नदी नाले, तलाव बोड्यात बऱ्यापैकी पाणी साचले असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ४१४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या ३६.१ टक्के पाऊस झाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.
सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी (दि.६) सलग तिसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावली. त्यामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून, शेतामध्ये शेतकऱ्यांची लगबग वाढल्याचे दिलासादायक चित्र आहे.
मजुरांची वाढली मागणी
सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला एकाच वेळी सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोवणीच्या कामासाठी मजुरांची एकाच वेळी मागणी वाढल्याने मजुरीच्या दरात सुध्दा वाढ झाली आहे, तर मजुरांच्या हाताला रोजगार मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.