धानाचे १९ कोटींचे चुकारे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:15 AM2019-03-10T00:15:13+5:302019-03-10T00:18:21+5:30
जिल्ह्यात पावसाने यंदा चांगली साथ दिल्याने धानाचे भरघोस उत्पादन झाले असून धान उत्पादक सुखावला आहे. यामुळेच, जिल्ह्यात भरभरून धान खरेदी होत असताना मार्केटींग फेडरेशनने २५० कोटी ३६ लाख रूपयांचे धान खरेदी केले आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात पावसाने यंदा चांगली साथ दिल्याने धानाचे भरघोस उत्पादन झाले असून धान उत्पादक सुखावला आहे. यामुळेच, जिल्ह्यात भरभरून धान खरेदी होत असताना मार्केटींग फेडरेशनने २५० कोटी ३६ लाख रूपयांचे धान खरेदी केले आहे. यातील २३० कोटी ८७ लाख रूपयांच्या धानाचे चुकारे केले असून १९ कोटी ४८ लाख रूपयांचे चुकारे अडले आहेत.
‘धानाचे कोठार’ अशी ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्यात निसर्गाच्या खेळीमुळे मागील काही वर्षे धानाचे उत्पादन धोक्यात आले होते. मागील काही वर्षांपासून पाहिजे त्या प्रमाणात धानाचे उत्पादन झाले नव्हते. मात्र यंदा सुरूवातीपासूनच पावसाने साथ दिल्याने भरभरून धान पीक झाले आहे. यामुळे यंदा धान उत्पादक संतोषला असून धानाचे कोठार पुन्हा एकदा भरभरून निघाले आहे. यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात धान खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशनने ४५ हजार १५४ शेतकऱ्यांकडून १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान खरेदी केली आहे. म्हणजेच, मार्केटींग फेडरेशनने आतापर्यंत २५० कोटी ३६ लाख रूपयांची धान खरेदी केली असून यातील २३० कोटी ८७ लाख रूपयांचे चुकारे केले आहे.
मार्केटींग फेडरेशनने जिल्ह्यातील ५७ केंद्रांवरून केलेल्या या धान खरेदीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्यास सुरूवात केली आहे. तरिही त्यांच्याकडे अद्याप सुमारे १९ कोटी ४८ लाख रूपयांचे चुकारे थकून आहे. विशेष म्हणजे, धान खरेदी अद्यापही सुरू असल्याने धान खरेदीची किंमत आणखी वाढणार आहे.
फेडरेशनने केली ५ कोटींची मागणी
मार्केटींग फेडरेशनकडे १९ कोटी ४८ लाख रूपयांचे चुकारे अडून असले तरी त्यातील १३ कोटी रूपये फेडरेशनला मिळाले आहेत. या १३ कोटींतून शेतकºयांचे चुकारे केले जात असून त्यासाठी प्रक्रीया सुरू आहे. सोमवारपर्यंत १३ कोटींचे चुकारे होणार असून ते शेतकºयांच्या बँक खात्यात आॅनलाईन जमा होणार आहेत. त्यामुळे उरलेले चुकारे करण्यासाठी फेडरेशनने शासनाकडे ५ कोटींची मागणी केली आहे.