१९३ डिजिटल शाळांची बत्तीगुल
By admin | Published: July 8, 2017 12:42 AM2017-07-08T00:42:40+5:302017-07-08T00:42:40+5:30
शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस,
पुढे पाठ मागे सपाट : बील न भरल्याने अनेक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, वाचन कुटी, दप्तर विरहित दिन असे विविध उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या; मात्र १९३ शाळांमध्ये विद्युत नसल्याने डिजिटल शाळा फक्त नावापुरत्याच की देखाव्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ६९ शाळा आहेत. या सर्व शाळा शिक्षण विभागाने लोकसहभागातून डिजिटल केल्या आहेत. परंतु शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीत आतापर्यंत २१ शाळांमध्ये विद्युत कनेक्शनच नाही. विद्युत कनेक्शन घेतलेल्या ज्या शाळांचा बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला, त्या शाळांची संख्या १७२ आहे. ज्या शाळांत विद्युतचीच सोय नाही त्या शाळांचतील संगणक निकामी आहेत. त्या शाळांना डिजिटल करण्यासाठी शेजारच्या घरातून उद्घाटनापूर्तीच वीज वापरली.
जिल्ह्यातील आमगावच्या ८९, अर्जुनी मोरगाव १३३, देवरी १०१, गोंदिया १६३, गोरेगाव ९०, सडक-अर्जुनी १०२, सालेकसा ६२ व तिरोडा १३६ शाळांत विद्युतची सोय आहे. जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये विद्युत कनेक्शनच नाहीत.
ज्या शाळांमध्ये संगणक आहेत ते विद्युतअभावी निकामी पडले आहेत. यात अर्जुनी-मोरगाव २, देवरी ८, गोंदिया १, गोरगाव १, सालेकसा ७ व तिरोडाच्या २ शाळांचा समावेश आहे.
सादीलवार राशीअभावी बिल भरले नाही
शाळेच्या उत्थानासाठी शासनाने मागील अनेक वर्षांपासून सादीलवार राशी न दिल्यामुळे शाळेच्या विद्युत कनेक्शनचे बिल मुख्याध्यापकांनी भरले नव्हते. परिणामी त्या शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. शासनाकडून अत्यल्प निधी दिला जात असल्याने विद्युतचा खर्च सांभाळने कठिण होत आहे. शाळांना विद्युत पुरवठा करण्यात येणाऱ्या बिलाची रक्कम व्यापार दरात लावली जाते. परंतु शाळांना देण्यात येणारे बिल घरगुती वापराच्या दरात लावल्यास विद्युत बिल भरणे मुख्याध्यापकांना सहज शक्य होईल
१७२ शाळांचा पुरवठा खंडीत
विद्युत बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील १७२ शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. यात आमगाव २७, अर्जुनी मोरगाव ३, देवरी ३५, गोंदिया २४, गोरेगाव १८, सडक-अर्जुनी १३, सालेकसा ५१ व तिरोडा येथील एका शाळेचे विद्युत कनेक्शन काढले आहे.