सात महिन्यात १९७ बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:08 PM2017-08-21T23:08:56+5:302017-08-21T23:09:36+5:30
जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अभियान राबविले जात आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अभियान राबविले जात आहे. मात्र दुसरीकडे याच अभियानाला काळे फासण्याचे काम बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय करीत आहे. गेल्या सात महिन्यात एकट्या गंगाबाईत रुग्णालयात १९७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
जिल्हा आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल आहे. या भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. यासाठी शून्य मृत्यू अभियान राबविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे केला.त्यांनी बैठका घेऊन सर्व आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांना सूचनाही दिल्या. मात्र गंगाबाईतील बालमृत्यूचे तांडव सुरूच आहे. गंगाबाईत आलेल्या रूग्णांची आकडेवारी पाहता जानेवारी महिन्यात ५६५ महिलांची प्रसूती करण्यात आली. त्यात आयूडी ११ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे पाच बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ८ बालके अश्या २४ बालकांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात ५१० महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी ८ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १३ बालके अश्या २३ बालकांचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात ५५४ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी ५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ९ बालके अश्या १६ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ४९७ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १० बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १२ बालके अश्या २४ बालकांचा मृत्यू झाला. मे महिन्यात ५६४ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे ५ बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १९ बालके अश्या ३९ बालकांचा मृत्यू झाला. जून महिन्यात ५२५ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे ४ बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ९ बालके अश्या २८ बालकांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात ५६६ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी २० बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील २१ बालके अश्या ४३ बालकांचा मृत्यू झाला. या सात महिन्यात बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात बालमृत्यूचे तांडव सुरू असतानाही आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनही निद्रावस्थेत आहे.
अतिदक्षता कक्षावर प्रश्नचिन्ह
गंगाबाई स्त्री रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबातील गर्भवती प्रसूतीसाठी दाखल होतात. येथे जन्माला येणारी बालके सर्व सामान्य बालकांच्या वजनापेक्षा कमी वजनाची असल्यामुळे त्या बालकांना योग्य उपचार देण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सुसज्ज नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला. परंतु येथे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ९१ बालकांचा मृत्यू झाला.
रिक्त पदांमुळे कर्मचारी त्रस्त
गंगाबाई स्त्री रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाºयांवर भार येत आहे. त्यामुळे त्यांना अठरा अठरा तास काम करावे लागते. गंगाबाई स्त्री रूग्णालयात ६ बधीरीकरण तज्ज्ञांची गरज आहे. परंतु येथे एकच तज्ज्ञ कार्यरत आहेत. मेडीकल कॉलेजचे बधीरीकरण तज्ज्ञ काम करीत नाही. गंगाबाई स्त्री रूग्णालयात सहा बालरोग तज्ज्ञांची गरज असताना केवळ तीनच कार्यरत आहेत. परिचारीकांची ६० पदे मंजूर असताना ३४ जागाच भरल्या आहेत. वर्ग चारचे ४० पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना स्ट्रेचरवर नेण्याचे काम नातेवाईकांनाच करावे लागते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गर्भातच दगावली ८४ बालके
गर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी केलेले दुर्लक्ष, वेळोवेळी उपचार नाही, खानपाणात अनियमितता, असंतुलीत आहार, प्रथीने, विटॉमीन, लोह गर्भवतींना वेळीच मिळत नसल्यामुळे त्यांच्या पोटातील गर्भाची वाढ होऊ शकली नाही. सतत होणाºया दुर्लक्षीततेमुळे जानेवारी महिन्यात ११, फेब्रुवारी ८, मार्च ५, एप्रिल १०, मे १५, जून १५ व जुलै २० अशा एकूण ८४ बालकांचा गर्भातच मृत्यू झाला.