१९९ शेतकऱ्यांचे चुकारे अडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 09:48 PM2019-06-14T21:48:45+5:302019-06-14T21:49:10+5:30
फक्त धानाची शेती करून उपजिविका चालविणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या बोनसच्या आश्वासनाला बळी पडून आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर आपले धान विकले. परंतु त्या १९९ शेतकऱ्यांचे एक कोटी रूपयांचे चुकारे करण्यात आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : फक्त धानाची शेती करून उपजिविका चालविणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या बोनसच्या आश्वासनाला बळी पडून आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर आपले धान विकले. परंतु त्या १९९ शेतकऱ्यांचे एक कोटी रूपयांचे चुकारे करण्यात आले नाही. मागील तीन महिन्यांपासून आपल्या हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकºयांना मागील वर्षाचे पैसे मिळाले नसल्याची ओरड आहे.
मागील वर्षी सालेकसा तालुक्यातील ग्राम मक्काटोला व सातगाव येथील दोन धान खरेदी केंद्रांवर परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाचे धान विकले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या बोनसमुळे त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावरच आपले धान विकले. ३१ मार्चपर्यंत आॅनलाईन खरेदी होती. परंतु धानखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान त्वरीत मोजणी होईल यासाठी विशेष यंत्रणा नसल्यामुळे ३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी करण्यात आली नाही. परंतु ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजता आॅनलाईन धान खरेदीची वेबसाईट बंद झाल्याने केंद्रावर आलेले धान मोजता आले नाही.
शेतकऱ्यांचे धान परतही पाठविता येत नव्हते. यामुळे अडचणीत सापडलेल्या धान खरेदी केंद्रावरील लोकांनी त्या धानाचे पंचनामे करून आॅफ लाईन धानाची खरेदी तब्बल तीन दिवस करण्यात आली.
परंतु आॅफ लाईन खरेदी करण्यात आलेल्या धानाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. आॅफ लाईन खरेदी करण्यात आलेल्या धानाचे आॅनलाईन नोंद केल्यानंतरच त्याचे पेमेंट शेतकऱ्यांना होऊ शकेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मक्काटोला केंद्रावरील ३१ शेतकऱ्यांचे ८९७.६० क्विंटल धानाचे १५ लाख ७० हजार ८०० रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही.
तर सातगाव धान खरेदी केंद्रावरील ८२ शेतकऱ्यांचे २२३३.६४ क्विंटल धान धारेदी करण्यात आले. त्याचे ३९ लाख नऊ हजार ८७० रूपये धानाचे चुकारे थकले आहेत.
तर काही ठिकाणचे तुरळक अशा एकूण १९९ शेतकऱ्यांचे आॅफलाईन खरेदी केलेल्या पाच हजार ७०९.४३ क्विंटल धानाचे ९९ लाख ९० हजार ७५० रूपयांचे चुकारे अडले आहेत.
साईट उघडण्यासाठी पाठपुरावा
मार्च अखेर विक्री केलेल्या धानाची आॅफलाईन खरेदी झाली. ती खरेदी आॅनलाईन होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन महिन्यांपासून धानाचे चुकारे मिळाले नाहीत. या १९९ शेतकऱ्यांच्या समस्येला घेऊन आदिवासी विकास महामंडळाने राज्य व केंद्र शासनाकडे मंजूरीसाठी प्रकरण पाठविले आहेत. आॅनलाईन खरेदी करण्यासाठी साईट उघडणे आवश्यक आहे. यासाठी अधिकाºयांचा पाठपुरावा सुरू आहे.
मागील वर्षी तीन वेळा उघडली होती साईट
३१ मार्च पर्यंतच धान खरेदी करण्यासाठी आॅनलाईन साईट सुरू होती. मागील वर्षी देखील हीच प्रक्रीया होती. परंतु मागील वर्षी तीन वेळा ही साईट सुरू करण्यात आली होती. परंतु यंदा एकदाही साईट सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांना धानाचे चुकारे अद्यापही होऊ शकले नाही.