2 कोटी 15 लाख मोजूनही बीजीडब्ल्यू रुग्णालय अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:20+5:30
खमारीच्या सबस्टेशनवरून एक्स्प्रेस फिडरचा केबल केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणण्यात आला होता, परंतु काही दिवसच सुरू राहिल्यानंतर ही एक्स्प्रेस फिडरची सेवा खंडित झाली. गोंदिया शहराच्या बाहेरून गेलेल्या बायपासमुळे या एक्स्प्रेस फिडरचे केबल तुटले. त्यामुळे सुरुवातीचा एक वर्ष सोडून एक्स्प्रेस फिडरची सेवा बंद आहे.
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : छोट्यातल्या छोट्याही आरोग्य संस्थेत २४ तास वीज व पाण्याची सोय असावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना, गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात २४ तास विजेची सोय नाही. २४ तास विजेची सोय मिळावी, म्हणून आरोग्य संस्थेने मागील १२ वर्षांत दोन वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला २ कोटी १५ लाख रुपये मोजले, परंतु इतके पैसे घेऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग २४ तास विद्युत सेवा देण्यास अपयशी ठरला.
साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी असलेले गोंदियाचे वैद्यकीय महाविद्यालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय आजघडीला भारनियमनाच्या संकटातून जात आहे. विद्युत आल्यावरच शस्त्रक्रिया सुरू करू, असे डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांना सांगावे लागत आहे. गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय येण्यापूर्वी म्हणजेच १२ वर्षांपूर्वी डॉ.के.जी. अग्रवाल प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाला २४ तास विद्युुत सेवा पुरविण्यासाठी एक्स्प्रेस फिडरसाठी १ कोटी ४० लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला दिले होते. त्या पैशांतून एक्स्प्रेस फिडर बसविण्यात आले.
खमारीच्या सबस्टेशनवरून एक्स्प्रेस फिडरचा केबल केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणण्यात आला होता, परंतु काही दिवसच सुरू राहिल्यानंतर ही एक्स्प्रेस फिडरची सेवा खंडित झाली. गोंदिया शहराच्या बाहेरून गेलेल्या बायपासमुळे या एक्स्प्रेस फिडरचे केबल तुटले. त्यामुळे सुरुवातीचा एक वर्ष सोडून एक्स्प्रेस फिडरची सेवा बंद आहे. डॉ.रवि धकाते यांनी पुन्हा विद्युतच सोय करण्यासाठी ७५ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला दिले होते, परंतु एवढी मोठी रक्कम मोजूनही आजही गोंदियाचे वैद्यकीय महाविद्यालय, केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय अंधारात आहे, परंतु आरोग्य विभागाचे अधिकारी या संदर्भात कुठलेच पाऊल उचलताना दिसत नाही.
शस्त्रक्रियेची वेळ लाईटवर ठरते
- अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करायची असल्यास, त्या रुग्णाची शस्त्रक्रिया डॉक्टर करीत नाही. विद्युत पुरवठा सुरू असलेल्या काळात गंभीर रुग्णावर शस्त्रक्रिया करायची असल्यास लाइट येण्यास वाट पाहावी लागते. अशातच रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.
ना हाय व्होल्टेज टेंशन; ना जनरेटर
- वर्षाकाठी ७ ते ८ हजार महिलांची प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात होते. जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून, गोरगरीब महिलांना प्रसूतीसाठी याच रुग्णालयात आणले जाते. या रुग्णालयाला २४ तास विजेची सोय उपलब्ध नाही. हाय होल्टेज टेंशन व जनरेटरची गरज असतानाही या रुग्णालयात याची सोय नाही. येथे येणाऱ्या गर्भवतींना विजेअभावी उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते.