२ हजार युनिट रक्ताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 09:30 PM2017-08-20T21:30:57+5:302017-08-20T21:32:23+5:30
विदर्भात रक्त संक्रमणात दुसºया क्रमांकावर असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रक्तपेढीत मागील २४ वर्षापासून रक्त विलगीकरण कक्ष व यंत्र नाही.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विदर्भात रक्त संक्रमणात दुसºया क्रमांकावर असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रक्तपेढीत मागील २४ वर्षापासून रक्त विलगीकरण कक्ष व यंत्र नाही. जिल्ह्यातील रूग्णांची संख्या पाहता वर्षाकाठी रूग्णांसाठी १० हजार रक्त युनिटची गरज असते. परंतु ही रक्त संक्रमण पेढी वर्षाकाठी ८ हजारांच्या घरात रक्त युनिट संकलन करते. २ हजार रूग्णांसाठी रक्त या पेढीतून पुरविता येत नाही. परिणामी गरीब रूग्णांना पैसे मोजून खासगी रक्तपेढीतून रक्ताची व्यवस्था करावी लागते.
गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रक्त संक्रमण पेढीने अनेकांना एचआयव्ही बाधीत केले. येथील एचआयव्ही दूषीत रक्ताचा पुरवठा बराच गाजला होता. गरीबांच्या कल्याणासाठी असलेल्या या रक्तपेढीतील गोरखधंदा अनेकवेळा चव्हाट्यावर आला. या रक्तसंक्रमण पेढीकडे शासन व अधिकाºयांचे होत असलेले दुर्लक्ष याची साक्ष येथील रक्तविलगीकरण देते. गंगाबाईतील रक्त संक्रमण पेढी जिल्ह्यातील एकमेव रक्तपेढी आहे. गरीब, गरजू व अतिजोखीमेच्या रूग्णांचा भार या रक्तसंक्रमण पेढीवर आहे. या रक्तपेढीमार्फत जानेवारी ते जुलै या ७ महिन्यांच्या काळात ४० रक्तदान शिबिरे घेण्यात आली.
या शिबिरांच्या माध्यमातून ४ हजार २१२ युनीट रक्त संकलन करण्यात आले. तर याच कालावधीत ४ हजार ३२१ रूग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. येथे रक्त संकलनापेक्षा रक्ताची मागणी अधिक असल्याचे स्पष्ट होते. पुरवठा करण्यात आलेल्या रक्ताच्या युनिटमध्ये ३ हजार २३० युनिट शासकीय रूग्णालय तर १ हजार ९१ युनिट खासगी रूग्णालयातील रूग्णांना पुरविण्यात आले. रक्ताच्या तुटवड्यामुळे रक्त मिळवून देणारे दलालही गंगाबाई स्त्री रूग्णालयात आहेत. रक्तदान शिबिरे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आयोजित करून गंगाबाईतील रक्त पेढीला रक्त संकलनासाठी बोलाविले तर येथील डॉक्टर व टेक्नीशियन्सना जाता येत नाही.
सर्व सोयीयुक्त अत्याधुनिक रक्तवाहीका नसल्याने ८ ते १० कॅम्पला या रक्तपेढीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहू शकले नाही. रक्तसंकलनासाठी लागणारे एकही डोनकॉऊच उपलब्ध नाहीत. पूर्वीचाच ताण असलेल्या या रक्तपेढीत एचआयव्ही दूषीत रक्त शोधण्यासाठी असलेल्या एलाईझा मशीन, फ्रिज व किट यांची गरज आहे. सन १९९३ मध्ये गंगाबाईतील रक्तपेढी सुरू करण्यात आली. या रक्तपेढीला २४ वर्षांचा कालावधी होऊनही येथे रक्तविलगीकरण होत नाही. मागील चार वर्षापूर्वी रक्तविलगीकरण कक्षासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला शासनाने ३५ लाख रूपये दिले. परंतु त्याचे बांधकाम आता सुरू करण्यात आले.
रक्त विलगीकरण युनिट सुरू झाल्यास येथील रक्तसंकलन वाढेल, रूग्णांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. रक्त विलगीकरण युनिटमुळे प्लेटलेट, प्लाझमा, लाल रक्तपेशी रक्तातील हे सर्व घटक वेगवेगळे करून ज्या रूग्णांना ज्या घटकांची गरज आहे ते पुरविण्यास सहज शक्य होईल. या रक्तपेढीत चार अधिकाºयांची गरज असताना एकच अधिकारी तर पाच टेक्नीशियनची गरज असताना चारच टेक्नीशियन आहेत.
१५२ रुग्ण सिकलसेल व थॅलेसिमियाचे
या रक्तपेढीत सिकलसेल व थॅलेसिमियाच्या १५२ रूग्णांची नोंद आहे. या रूग्णांना दरमहिन्याला मोफत पुरवठा करण्याची जबाबदारी या रक्तसंक्रमण पेढीवर आहे. गोंदिया जिल्हा सिकलसेलग्रस्त जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा गोंदिया जिल्ह्यात सिकलसेल व थॅलेसिमीयाच्या रूग्णांची संख्या अधिक आहे. जानेवारी ते जुलै या ७ महिन्यांच्या काळात सकलसेल व थॅलेसिमीयाच्या रूग्णांना ६३० रक्त युनिट पुरविण्यात आले. रक्तदान शिबिरे घेण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती केली जात नाही.
अमृत योजना फसवी ठरली
गोंदिया जिल्ह्यातील गरोदर मातांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आहे. या शासकीय रक्तपेढीद्वारे गरोदर माता, सिकलसेल, थॅलेसिमीयाचे रूग्ण, एक वर्षाखालील बालके, बीपीएलधारक रूग्ण व ऐच्छीक रक्तदान करणाºया लोकांना मोफत रक्त पुरविले जाते. अमृत योजनेद्वारे जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या काळात २०६ रूग्णांना या योजनेमार्फत मोफत रक्त पुरविण्यात आले. त्यातील ९३ रूग्ण शासकीय रूग्णालयातील तर ११३ रूग्ण खासगी रूग्णालयातील आहेत. शासकीयपेक्षा खासगी रूग्णालयातील रूग्णांना अधिक मोफत रक्ताचा पुरवठा करण्यात आला. शासकीय रूग्णालयातील गरीब रूग्णांना डावलून खासगी रूग्णालयातील श्रीमंत रूग्णांना हा मोफत रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. गंगाबाई किंवा केटीएस मधील रूग्णांना रक्त उपलब्ध नसल्याचे सांगून टाळले जाते. त्यामुळे अमृत योजना ही रूग्णांसाठी फसवी ठरली आहे. या योजनेतील किती रूग्णांना रक्त देण्यास टाळण्यात आले याची आकडेवारी मात्र गंगाबाईतील रक्तपेढीकडून लपविण्यात आली. ही माहिती पुढे आली तर या योजनेत जेवढ्यांना रक्त पुरविण्यात आले त्यापेक्षा दुप्पट रक्त देण्यास नकार देणाºयांची आकडेवारी समोर येऊ शकते.