२० टक्के दुग्ध उत्पादनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:12 AM2018-05-23T00:12:43+5:302018-05-23T00:12:43+5:30
दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र शेतकऱ्यांची विदारक स्थिती आहे. पारंपरिक शेतीमुळे दिवसेंदिवस शेती म्हणजे घाट्याचा सौदा होत चालली आहे. शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र शेतकऱ्यांची विदारक स्थिती आहे. पारंपरिक शेतीमुळे दिवसेंदिवस शेती म्हणजे घाट्याचा सौदा होत चालली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे. सन २०११-१२ पासून गोंदिया जिल्ह्यातील ३०६ गावांना कामधेनू ग्राम म्हणून दत्तक योजनेतंर्गत दत्तक घेवून २० टक्के दुग्ध उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र आहे.
गावात दूध उत्पादनात वाढ करण्यात यावी. पशुपालनाला तांत्रीक जोड देऊन लसीकरणापासून जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तक गावात करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सन २०१८-१९ या वर्षात ३० गावांचा समावेश आहे. त्या गावात पूर्वीच्या तुलनेत २० टक्के दूध उत्पादन वाढले आहे.
शेतकऱ्यांच्या पारंपारीक शेतीला पूरक जोड देणारा दुग्ध व्यवसायात वाढ झाली आहे. सन २०११-१२ पासून कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यात आली. यावर्षी ३१ गावे दत्तक घेण्यात आली होती. सन २०१२-१३ या वर्षी ६५ गावे, सन २०१३-१४ या वर्षी ६७ गावे, सन २०१४-१५ या वर्षी ५३ गावे, सन २०१५-१६ या वर्षी ३२ गावे, सन २०१६-१७ या वर्षी ३२ गावे, सन २०१७-१८ या वर्षी २६ गावे अशा ३०६ गावांना कामधेनू योजनेत दत्तक घेण्यात आले. त्या गावातील पशुपालकांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे त्या गावातील दूध उत्पादनात २० टक्याने वाढ झाल्याचे दिलासा दायक चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे सन २०१८-१९ या वर्षात कामधेनू दत्तक ग्राम म्हणून ३० गावांची निवड केली. ३०० पैदास योग्य पशू असणाऱ्या या गावांची पशू गणना करून त्या गावांची कामधेनू दत्तक ग्राम म्हणून निवड करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून १२ टप्यात पशू गणना करून सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गावाला कामधेनू दत्तक ग्राम म्हणून पशूसंवर्धन विभागाने दत्तक घेतले.
ज्या गावाला दत्तक घेतले त्या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण, दुग्ध उत्पादन किती आहे, दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल. जनावरांची औषधे, खनिजद्रव्ये, जंतनाशक औषधी, गोचीड, शेतकऱ्यांची सहल नेणे, नाविन्यपूर्ण उपक्रम, संकरीत वासरांचा मेळावा घेऊन त्यांना बक्षीस देणे, वैरण विकासासाठी प्रयत्न करणे, जनावरांच्या विस्तारासाठी कार्यक्रम घेणे, गोठा स्वच्छ करणे, चाºयाचे व खताचे व्यवस्थापन करण्यात येते.
या दत्तक गावाला वर्षासाठी एक लाख ५२ हजार रूपये त्या गावाला जनवारांच्या संवर्धनासाठी देण्यात येतात. गावातील सर्वाधीक पशु मालकाला पशू मालक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते.
अधिकाऱ्यांचा रात्री मुक्काम
कामधेनू गावातील शेतकºयांना व पशुमालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक व त्यांचे इतर अधिकारी त्या गावात एक दिवस मुक्काम करतात. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ कशी करता येईल. यावर मार्गदर्शन करतात. कामधेनू गावात पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे डॉ.वासनिक यांनी सांगितले.
यंदाचे कामधेनू दत्तक गाव
जिल्हा पशूसंर्वधन विभागाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३० गावांना दत्तक ग्राम म्हणून घेतले होते. त्यात टेमणी, शिरपूर, कोरणी, डांगुर्ली, अदासी, नवेगाव, कवळी, करंजी, मक्कीटोला, अंजोरा, हलबीटोला, पिपरीया, पोवारीटोला, बंजारी, मुरदोली, इस्तारी, चोरखमारा, ठाणेगाव, मेहंदीपूर, मनोरा, पूरगाव, तेलनखेडी, कुऱ्हाडी, तेढा, कोसबी-कोल्हारगाव, तिडका, पांढरी-हलबीटोला, नवेगावबांध, महागाव व बोंडगावदेवी या गावांचा समावेश आहे.