२० हजार पात्र शेतकरी कर्जमाफीसाठी वेटींगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:00 AM2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:13+5:30

कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का?यासाठी शेतकरी बँकाच्या दररोज पायऱ्या झिजवित आहे. मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच असल्याने बँका आणि सहकार निबंधक विभागाची यंत्रणा देखील त्रस्त झाली आहे.

20 thousand eligible farmers on waiting for loan waiver | २० हजार पात्र शेतकरी कर्जमाफीसाठी वेटींगवर

२० हजार पात्र शेतकरी कर्जमाफीसाठी वेटींगवर

Next
ठळक मुद्देदोन वर्षांपासून प्रक्रिया सुरूच : यंत्रणाही त्रस्त : शेतकरी पायऱ्या झिजविण्यात व्यस्त

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तत्कालीन भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील २० हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांनी बँका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पायपीट सुरू आहे.
शासनाने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीकरिता जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. पडताळणीनंतर यापैकी ८३ हजार ५४३ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या ग्रीन याद्या बँका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.
आत्तापर्यंत बँका, सहकार निबंधक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाला एकूण ३२ ग्रीन याद्या प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार ६३ हजार १५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ११८ कोटी रुपये कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात आले आहे.यात जिल्हा बँकेकडे ५२ हजार ६८८ शेतकरी सभासद, ग्रामीण बँकेच्या ३ हजार ८१४ आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या ७ हजार ५८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. मात्र कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण ८३ हजार शेतकऱ्यांपैकी अद्यापही २० हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम झाली नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तर कर्जाच्या रक्कमेवरील व्याज देखील भरावे लागत आहे.
कर्जमाफीची रक्कम बँक खात्यावर जमा झाली का?यासाठी शेतकरी बँकाच्या दररोज पायऱ्या झिजवित आहे. मात्र त्यांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच असल्याने बँका आणि सहकार निबंधक विभागाची यंत्रणा देखील त्रस्त झाली आहे.

दोन वर्षांपासून पीक कर्जाला मुकले
जे शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरले. त्यांचे कर्ज निश्चित माफ होणार होते. त्यामुळेच या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन पीक कर्जाची उचल केली नाही. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही २० हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागले. तर दुसरीकडे त्यांना व्याजाचा भूर्दंड देखील सहन करावा लागत आहे.
चूक शासनाची शिक्षा शेतकऱ्यांना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत तत्कालीन भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमार्फी जाहीर करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही पात्र संपूर्ण शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय कर्जमाफीसाठी बँकांच्या पायºया झिजवाव्या लागत आहे. त्यामुळे चूक शासनाची आणि शिक्षा शेतकऱ्यांना असेच चित्र आहे.
जुने संपेना नव्याची घाई
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या २० हजार शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. हीच प्रक्रिया पूर्ण करण्यात यंत्रणा व्यस्त आहे. तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने सुध्दा शेतकरी कर्जमाफीचे संकेत दिले आहे. त्याच दृष्टीने विभागीय आयुक्तांनी सहकार निबंधक कार्यालयाला कर्जधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जुने संपेना आणि नव्याची घाई असे चित्र आहे.

Web Title: 20 thousand eligible farmers on waiting for loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.