२० हजार शेतकरी सावकारांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:25 PM2018-08-01T22:25:57+5:302018-08-01T22:29:50+5:30
जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी आहे.
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाखांवर शेतकरी आॅनलाईन अर्ज केले होते. अर्जाच्या पडताळणीनंतर जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. त्यापैकी जुलै अखेर ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यावर १४५ कोटी रुपये जमा करण्यात आले. मात्र उर्वरित शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना प्राप्त झाली नाही.परिणामी मागील सहा महिन्यापासून २० हजार शेतकरी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाच्या पायऱ्या झिजवित आहेत.
शेतकरी कर्जमाफीची यादी आली का म्हणून दररोज बँकाच्या पायऱ्या झिजवित आहे. तर बँका शेतकऱ्यांना महाआॅनलाईनकडून ग्रीन यादी आली नसल्याचे सांगत आहे. तर सध्या रोवणीची कामे जोमात सुरु असून शेतकऱ्यांना खते आणि मजुरीचा खर्च देण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना नातेवाईक आणि सावकारांकडून कर्ज घेण्याची पाळी आली आहे.
जुने माफ होईना नवीन मिळेना
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे निश्चित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जर कर्जाची रक्कम भरली तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर दुसरीकडे जोपर्यंत त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होवून त्यांचे खाते शून्य होत नाही, तोपर्यंत त्यांना नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे जुने माफ होईना आणि नवीन पीक कर्ज मिळेना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
व्याजाचा दर वाढला
सध्या खरीप हंगाम सुरू असून रोवणीची कामे सुरु आहे. वेळेवर रोवणी झाली नाही तर शेतकºयांना हंगामाला मुकावे लागेल. त्यामुळे वर्षभर कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. हंगाम हातून जावू नये यासाठी शेतकरी सावकारांच्या दारात जात आहे. मात्र सावकार शेतकऱ्यांच्या झालेल्या कोडींचा फायदा घेत असून दहा ते बारा टक्के व्याजाची आकारणी करीत असल्याची माहिती आहे.
वर्षपूर्तीनंतरही तिढा कायम
राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला नुकताच वर्षभराचा कालावधी पूर्ण झाला मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्णपणे लाभ मिळालेला नाही. तर कर्जमाफीच्या ग्रीेन याद्यांवरुन दिवसेंदिवस तिढा वाढत असल्याचे चित्र आहे.
महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंब
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी होवून अंतीम ग्रीन शासनाने नियुक्त केलेल्या महाआॅनलाईनकडून बँकांना पाठविली जात आहे. त्यानंतर बँका शेतकऱ्यांच्या बँकाखात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करुन त्यांचे खाते शून्य करीत आहे. मात्र महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंब होत असल्याने जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांची कोंडी होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता बँक कर्मचाऱ्यांची दमच्छाक होत आहे.