अत्याचारी शिपायाला २० वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:09+5:302021-09-21T04:32:09+5:30
गोंदिया : शौचास जात असलेल्या अल्पवयीन (१७) मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायाला विशेष जलदगती न्यायालयाने २० वर्षांचा ...
गोंदिया : शौचास जात असलेल्या अल्पवयीन (१७) मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायाला विशेष जलदगती न्यायालयाने २० वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सन २०१४ मधील हे प्रकरण आहे. शिवपूजनसिंह सूरजनाथसिंह बैस (५५, रा.शास्त्री वाॅर्ड निर्मल टॉकीजच्या मागे, गोंदिया, बक्कल नंबर १५९०) असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे.
२३ फेब्रुवारी, २०१४ रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी शिवपूजनसिंह सूरजनाथसिंह बैस हा पोलीस दवनीवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना, तो मोटारसायकलने गोंदियाकडे येत असताना, त्याने पीडित मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होते. त्यानंतर, १४ मार्च, २०१४ रोजी रात्री ९.३० वाजता पीडित मुलगी शौचास जात असताना, तिला आवाज देऊन थांबविले व ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या संदर्भात आरोपीविरुद्ध दवनीवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. या प्रकरणाचा तपास दवनीवाडा येथील सहायक पोलीस निरीक्षक डी.जी. बोकारे यांनी केला होता.
या प्रकरणात आरोपीला ६ जुलै, २०१४ रोजी छत्तीसगड राज्यातील जांजगीर जिल्ह्यातील बाराद्वार येथून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात भादंविचे कलम ३७६ (२) (एन), ४, ६ बाललैंगिक अत्याचार अधिनियमांतर्गत आरोपी शिवपूजनसिंह बैस याला विशेष जलदगती न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभदा तोडणकर यांनी २० सप्टेंबर रोजी केली आहे. या प्रकरणात न्यायालयात १८ साक्षीदार तपासण्यात आले आहे. सरकारी वकील म्हणून ॲड.कृष्णा पारधी यांनी काम बघितले.