जिल्ह्यात तयार होणार २०० शेतकरी गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:25 AM2018-01-07T00:25:40+5:302018-01-07T00:25:51+5:30
शेतकऱ्यांना प्रोत्साहन व सबळीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीला सुरूवात करण्यात आली आहे. या गटाचे काम प्रभावशाली करण्यासाठी विशेष उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीसाठी गट स्थापन करणाऱ्या गटांना उत्पन्न दुप्पट वाढविण्याची संधी प्राप्त झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांना प्रोत्साहन व सबळीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीला सुरूवात करण्यात आली आहे. या गटाचे काम प्रभावशाली करण्यासाठी विशेष उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीसाठी गट स्थापन करणाऱ्या गटांना उत्पन्न दुप्पट वाढविण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी या गटांना शासन कृषीसाठी वापरात येणारे यंत्र, अवजारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध कृषी विषयक कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हा प्रशासनाने निर्विष्ठा, प्रशिक्षण, यांत्रिकीकरण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, कृषी माल प्रक्रिया व पणन यावर जनजागृती करणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी सामूहिक शेती, आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजन शेतकरी गटांमार्फत प्रोत्साहन दिले जाणार आहे. एकाच शिवारातील भौगोलिक क्षेत्रामध्ये संलग्न शेती असणाऱ्या किमान २० शेतकऱ्यांचा १०० एकर क्षेत्र असलेल्या समूहाला नियोजनबद्धरित्या शेती करणे, शेतीमालावर प्रक्रिया व मुल्यवर्धन करणे, एकत्रित विपणन करणे व त्यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करणे, एकत्रितपणे शेती करण्यासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे व यांत्रिकीकरणाद्वारे एकत्रित शेती करण्याचे काम गट शेतीतून होणार आहे. जिल्ह्यात सेंद्रीय शेती करणारे ५० गट आहेत. परंतु आता २०० गट तयार होणार आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास किमान एक समूह असेल. नक्षलग्रस्त तालुका, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी, शेतकरी उत्पादक गटांनी तयार केलेल्या आराखड्यात लागणारा निधी, बँकीग प्रणालीच्या माध्यमातून मिळणार असल्याबाबत करार केला जाईल. घाऊक विपणन कंपन्यांसोबत उत्पादन व विक्री व्यवस्थेच्या मुल्य साखळी बाबतचा करार केला असेल अशा शेतकरी उत्पादक गटाला याचा लाभ होणार आहे. समूहातील शेतकऱ्यांची संख्या २० व शेती क्षेत्र १०० एकर असेल. ज्या ठिकाणी संरक्षित भाजीपाला, संरक्षित फुल पिके यासाठी पॉलीहाऊस शेडनेटचे माध्यमातून समूह निर्माण होत असल्यास अशा ठिकाणी किमान क्षेत्र मर्यादा २५ एकर एका अपगटासाठी राहील. या शेती गटाचे उत्पादन वाढविण्यासाठी १ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
सहकार्याची भावना निर्माण करणे
समूहशेती प्रकल्पामध्ये शेती उत्पादन पध्दती, विपणनाचे नियोजन, अंमलबजावणी सामूहिकरीतीने करणे महत्वाचे आहे. या दृष्टीकोनातून सामूहिक संघ भावना निर्माण करण्यासाठी प्रकल्प कालावधीत किमान मंडळ कृषी अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे.
उत्कृष्ट गटांना मिळणार पुरस्कार
उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ३ गटांना राज्यस्तरावर पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. या पुरस्कारासाठी गट, समूह, शेतकरी कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.