२०० कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 05:00 AM2022-04-16T05:00:00+5:302022-04-16T05:00:02+5:30
शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाऱ्यांना मोठ मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे यामध्ये पाणी साठून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे.
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दुष्काळी स्थितीत बंधाऱ्यांच्या मदतीने शेतीला सिंचनाची सोय करता यावी, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. मात्र बंधारे तयार केल्यानंतर त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. जिल्ह्यातील २०० कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागांतर्गत २९४ कोल्हापुरी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमुळे १० हजार ७४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकते. मात्र ३९ बंधारे नादुरुस्त असल्यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचीत होऊ शकत नाही. पाटबंधारे विभागांतर्गत २०० कोल्हापुरी बंधारे आहेत. जिल्ह्यातील २०० कोल्हापुरी बंधारे हे भग्नावस्थेत आहेत.
शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाऱ्यांना मोठ मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे यामध्ये पाणी साठून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे. सिंचन विभाग या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची डागडुजी करण्याऐवजी नवीन बंधारे तयार करण्यावर भर देत आहेत. कोल्हापुरी बंधाऱ्यांची योग्य देखभाल दुरुस्ती न केल्याने त्यांची हालत खस्ता झाली आहे.
बांधकामाकडे लक्ष; देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
n पाटबंधारे विभाग किंवा जिल्हा परिषद कोल्हापुरी बंधारे नवीन बांधकाम करण्याकडे विशेष लक्ष देते. नवीन बांधकामात अधिकाऱ्यांना मिळकत मोठी मिळत असल्याने ते नवीन कामाकडे लक्ष देतात. परंतु बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा बंधाऱ्यांचे काम पद्धतशीर व्हावे याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
बंधाऱ्याच्या लोखंड प्लेट चोरी
- बाघ नदीवर तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या प्लेट चोरीला गेल्याने नदीचे पाणी अडून न राहता वाहून जाते. अनेक बंधाऱ्यांच्या प्लेट चोरीला गेल्याने या बंधाऱ्यांमध्ये एकही वर्षी पाणी साठून राहत नाही. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना पुराचा तडाखा बसल्याने या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला खिंड पडली आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे लाखो रुपये खर्चून करून तयार करण्यात आलेले हे दोन्ही बंधारे केवळ नावापुरतेच ठरत आहे. बाघ नदीवर तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या लाखो रुपये किमतीच्या लोखंडी प्लेट चोरीला गेल्या आहेत.