२१ उमेदवारांनी केले आपले अर्ज सादर, सरपंचसाठी चार तर सदस्यांसाठी १७ अर्ज
By कपिल केकत | Published: October 19, 2023 07:17 PM2023-10-19T19:17:45+5:302023-10-19T19:18:45+5:30
चार ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक तर १० ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुका होत आहेत.
गोंदिया : जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक व १० ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (दि.१९) एकूण २१ अर्ज सादर करण्यात आले. यामध्ये सरपंच पदासाठी चार तर सदस्यपदासाठी १७ उमेदवारी अर्ज होते. विशेष म्हणजे, शुक्रवारी (दि.२०) शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी चांगलीच गर्दी राहणार.
जिल्हयात चार ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक तर १० ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. यासाठी सोमवारपासून (दि.१६) उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र आतापर्यंत अवघ्या जिल्ह्यात कोठेही उमेदवारी अर्ज आले नव्हते. मात्र गुरूवारी (दि.१९) अवघ्या जिल्हयात एकूण २१ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. मात्र त्यातही सडक-अर्जुनी, देवरी व गोरेगाव तालुक्यातून एकह उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला नव्हता. तर शुक्रवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच तालुक्यांत उमेदवारांची गर्दी उसळणार यात शंका नाही.
असे आले आहेत उमेदवार अर्ज
गोंदिया तालुक्यात ग्राम माकडीसाठी सरपंचपदासाठी एक व सदस्य पदासाठी सहा अर्ज, तिरोडा तालुक्यात ग्राम बोरगाव येथे सदस्य एक, ग्राम चुरडी सदस्य एक, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ग्राम येरंडी-देवलगाव येथे सरपंच दोन तर सदस्य दोन, सालेकसा येथे ग्राम तिरखेडी येथे सदस्य एक व ग्राम पाऊलदौना एक तसेच आमगाव तालुक्यातील ग्राम जांभूळटोला येथे सरपंचपदासाठी एक तर सदस्यपदासाठी सहा उमेदवारी अर्ज आले आहेत.
तालुकानिहाय उमेदवारी अर्जांचा तक्ता
तालुका - उमेदवारी अर्ज
गोंदिया- माकडी (सरपंच १- सदस्य ६)
तिरोडा- बोरगाव (सदस्य १), चुरडी (सदस्य १)
अर्जुनी-मोरगाव- येरंडी-दे. (सरपंच २- सदस्य २)
सालेकसा- तिरखेडी (१), पाऊलदौना (१)
आमगाव- जांभूळटोला (सरपंच १- सदस्य ६)