दीड एकरमध्ये २१०० झाडे
By admin | Published: October 13, 2016 01:54 AM2016-10-13T01:54:08+5:302016-10-13T01:54:08+5:30
शेती हा पोटापाण्याचा धंदा नसून तो एक राष्ट्रीय व्यवसाय आहे. शेतीची उत्पादकता वाढली तर देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढेल,
पाच लाखांचे उत्पादन : विहीरगावच्या शेतकऱ्याने फुलविली केळीची बाग
बोंडगावदेवी : शेती हा पोटापाण्याचा धंदा नसून तो एक राष्ट्रीय व्यवसाय आहे. शेतीची उत्पादकता वाढली तर देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढेल, असा महत्वाचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कृषी धोरणाबाबत मांडले. शेती हा एक उद्योग आहे असे मनामध्ये बिंबवून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका छोट्याशा विहीरगाव या खेड्यातील विश्वनाथ वालदे या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या साथीने तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून नगदी पिकांची लागवड करण्याचा नाविण्य उपक्रम राबवित आहे. दीड एकर शेतीमध्ये केळींची लागवड केली आहे. मनमोहक फुललेली केळीची बाग मोठ्या दिमाखाने उभी असल्याचे दिसून येत आहे.
विहीरगाव (बर्ड्या) येथील विश्वनाथ वालदे यांच्याकडे सामूहिक जवळपास साडेचार एकर शेतजमीन आहे. दहावीपर्यंत शिक्षित असलेले विश्वनाथ वालदे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वेळोवेळी सानिध्यात राहून त्यांच्या मार्गदर्शनातूनच तंत्रशुद्ध पद्धतीने नवनवीन पिके घेण्याचा विक्रम करतात. एकूण जमिनीपैकी दीड एकरामध्ये केळीची लागवड १५ आॅक्टोबर २०१५ रोजी केली होती. जीनायन टीशू कल्चर जैन या जातीचे २०५० केळीच्या झाटांची लागवड केली होती. दोन सऱ्यातील अंतर साडे पाच फूट अंतराने रोपे लावण्यात आलेली आहेत. या झाडांपैकी २१०० झाडे आज घडीला केळांच्या घडांनी बहरलेली दिसून येत आहे.
केळीच्या बागेची मशागत विश्वनाथ, त्यांची पत्नी कलीता, मुलगा दुष्यांत स्वत: वेळी-अवेळी करतात. तब्बल एक वर्षाने बागेतील केळींचे उत्पादन निघणे सुरू झाले. झाडाला लागलेला एक घड सरासरी २२ किलोचा असल्याचे विश्वनाथ वालदे यांनी सांगितले. लागलेल्या केळी विक्रीस योग्य असल्याने त्यांनी छत्तीसगडमधील भिलाई येथील एका व्यापाऱ्याशी सौदा पक्का झाल्याचे सांगितले. प्रतिकिलो १२ रुपयेप्रमाणे शेतामधून उचलण्याचा भाव ठरला. बागेतील २१०० झाडांवरील केळांच्या विक्रीमधून ५ लाख ५४ हजार ४०० रुपये अपेक्षित आहेत.
केळींचे उत्पादन घेण्यासाठी वर्षभर १ लाख ३६ हजार ५०० रुपयाचा खर्च झाल्याचे त्या युवा शेतकऱ्याने सांगितले. केळीची बाग फुलविण्यासाठी एकूण खर्च वजा जाता शुद्ध नफा ४ लाखाच्यावर मिळेल, असा आशावाद त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केला. तीन वर्ष केळीच्या बागेतून उत्पन्न मिळणार आहे. शेतीकडे व्यवसाय या दृष्टीकोणातून पाहिल्यास निश्चितपणे शेती फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
- ठिंबक सिंचनाचा उपयोग
विश्वनाथ वालदे या युवा शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या यशस्वी मार्गदर्शनाने ठिंबक सिंचनाची सोय शेतीमध्ये केली आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून शेतीमध्ये ओलीताची सोय केली जाते. अल्प प्रमाणात शेती असूनसुद्धा त्यांनी विविध पिके घेण्यासाठी त्यांची संघर्षमय तळमळ वाखाण्यासारखी आहे. दोघेही पती-पत्नी व साथीला मुलगा शेती हाच आपला व्यवसाय समजून घाम गाळतात. दिवस-रात्र मेहनत घेतात. शेतात डौलाने पीक उभे राहते. परंतु वन्यप्राण्यांचा होणारा उपद्रव हाच आर्थिक नुकसानीस कारणीभूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेडनेटद्वारे पिकांचे उत्पादन
गेल्या काही वर्षापूर्वी १० आर जागेत विश्वनाथ वालदे यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने शेडनेट उभे केले. यातून कारले, शिमला मिरची, वांगे आदी विविध पिके घेणे सुरू आहे. शेडनेटच्या माध्यमातून पिकांची वाढ होवून भरघोष उत्पादन होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध उत्पादन घेण्याचा माणस
विश्वनाथ वालदे यांच्याकडे असलेल्या साडेचार एकर शेतीमध्ये विविध पिके घेण्याचा त्यांचा माणस आहे. मागील वेळी त्यांनी टरबूजसुद्धा लावले होते. आजघडीला केळीच्या बागेसह, अर्धा एकरात टमाटर, भाताची लागवड केली आहे. चवळीच्या शेंगा, मेथी, पालक यासारखे पिकांचे उत्पादन घेतले.
पॅक हाऊसची गरज
कृषी विभागाच्या सल्ल्याने वेळोवेळी नवनवीन पिकांचे उत्पादन घेणारे विश्वनाथ वालदे यांनी पॅक हाऊस अति गरजेचे असल्याचे सांगितले. अनेकदा पिके तोडून ठेवल्यावर व्यापारी काही कारणास्तव मालाची उचल करीत नाही. अशावेळी तोडलेला माल ठेवण्यासाठी पॅक हाऊस आवश्यक असल्याने विश्वनाथ व पत्नी कलीता या युवा शेतकऱ्यांनी ते जोडण्याचे मत व्यक्त केले आहे.