२२ केंद्र धान खरेदीपासून वंचित
By admin | Published: November 25, 2015 05:39 AM2015-11-25T05:39:53+5:302015-11-25T05:39:53+5:30
शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये त्यांचे धान आधारभूत किंमतीत खरेदी केले जावे यासाठी शासनाचे धान खरेदी केंद्र
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : मार्केटिंगचे ३६ तर आदिवासींचे २८ केंद्र सुरू
गोंदिया : शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये त्यांचे धान आधारभूत किंमतीत खरेदी केले जावे यासाठी शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू केले जाते. परंतु यंदा दिवाळीला पंधरवाडा उलटूनही जिल्ह्यातील २२ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यात जिल्हा मार्केटींगचे १० तर आदिवासी विभागाचे १२ केंद्राचा समावेश आहे.
जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत ४६ धान खरेदी केंद्र सुरू करायचे होते. यातील ३६ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तर १० केंद्र अद्याप सुरू झाले नाही. आतापर्यंत ३४ हजार २३४ क्विंटल धानाची खरेदी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी गणेश खर्चे यांनी दिली आहे. आदिवासी विभागामार्फत गोंदिया जिल्ह्यात ४० धान खरेदी केंद्र सुरू करायचे होते. परंतु आतापर्यंत २८ केंद्र सुरू करण्यात आले. उर्वरीत १२ केंद्र सुरू करण्यात आले नाही. आदिवासी सोसायट्यांनी ४ हजार ६५२ क्विंटल धान खरेदी करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक राजूलकर यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
या ठिकाणचे केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत
जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यामार्फत येणाऱ्या १० ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. काटी, धाबेटेकडी, भीवखीडकी, बाक्टी, कोटजंभूरा, येडमाकोट व मुरपार येथे गोदामाची सोय नसल्याने, अदासी येथे कर्मचारी नसल्याने, टेमणी व पांढरी येथील संस्थेची नुकतीच निवडणूक झाल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक झाली नाही. परिणामी धान खरेदीला सुरूवात झाली नाही. आदिवासी विकास महामंडळातर्फे सालेकसा, सातगाव, सावली, मुरदोली, भर्रेगाव, दरेकसा, पिपरीया, सालेकसा,बिजेपार, साखरीटोला, मक्काटोला व कोयलारी येथे धान खरेदीकेंद्र सुरू करण्यात आले नाही.
गोदामांची समस्या आहे. मात्र ती समस्या लवकरच सोडवू. ज्या ठिकाणी गोदामांची समस्या आहे, अशा ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या समित्या धान खरेदी करणाऱ्यास इच्छुक असतील तर नियमाच्या अधिन राहून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने धान खरेदी करण्याचे आदेश दिले जातील.
गणेश खर्चे
जिल्हा मार्केटींग अधिकारी गोंदिया.