तीन वर्षात जिल्ह्यात २२५ आंतरजातीय विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:14 PM2018-01-14T21:14:31+5:302018-01-14T21:15:00+5:30
समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी, जातीभेदाचे उच्चाटन व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून केले जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाने ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचे ठरविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी, जातीभेदाचे उच्चाटन व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून केले जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाने ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचे ठरविले आहे. सन २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षात जिल्ह्यात २२५ आंतरजातीय विवाह झाले आहेत.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाने ५० हजार रूपये आर्थिक मदत देण्याची योजना सुरू केली आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहान दिले जात नव्हते. मात्र महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आणली तेव्हापासून या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. गावा-गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी आपापल्या गावातील प्रेमीयुगुलांचे शुभमंगल लावून दिले. यात आंतरजातीय विवाह करणारे जोडपी अनेक आहेत. परंतु सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणाºया योजनेच्या लाभासंदर्भात त्यांना माहीती नसल्यामुळे ते यापासून वंचित राहत आहेत.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या पैकी असावा तर दुसरा स्वर्ण हिंदू, जैन, लिंगायत किंवा शिख धर्मीय असवा. मागासवर्गीयांमध्ये आंतरप्रवर्गात विवाह झाला असेल तर या विवाहातील जोडप्यांना संयुक्त नावाने ५० हजार रूपयाचा धनादेश देण्यात येतो.
सन २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षात आंतरजातिय विवाह करणाऱ्या २२५ जोडप्यांना लाभ देण्यात आला. १ कोटी २५ लाख ३५ हजार रूपयांचा लाभ देऊन समाजात सामाजिक समता नांदण्यास मदत करण्यात आली.
गावात जातीय सलोखा यशस्वी
महाराष्टÑ शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली. तंटामुक्त चळवळीने ग्रामीण भागात अनेक समाजोपयोगी कामे केली. इतकेच नव्हे तर गावातील भांडण तंटे मिटवून गावात जातीय सलोखा कायम राखण्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना यश आले. आंतरजातीय विवाह होणे गावात अवघड असते. यातच आंतरजातीय विवाह झाले तर वर किंवा वधूच्या जीवाला कुटुंबियांकडून धोका असतो. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन जातीय सलोखा कायम राखला.
त्या जोडप्यांना लाभ द्या
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आली. तेव्हापासून प्रेमीयुगुलांना साथ मिळाली. आंतरजातीय विवाहाला मुला-मुलीकडील कुटुंबियांचा विरोध असला तरी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या मदतीने त्या जोडप्यांचे शुभमंगल लावून दिले जाते. परंतु त्या लग्नातील जोडप्यांना लाभ मिळावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या पुढाकार घेत नाही. किंवा लग्न करणाºया जोडप्यांना यासंदर्भात पुरेशी माहिती नसल्यामुळे ते अर्जच करू शकत नाही. परिणामी ते या लाभापासून वंचीत राहतात.