जिल्ह्यात २२.५५ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:34+5:302021-06-11T04:20:34+5:30
गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावे, हे एकच उद्दिष्ट बाळगून शासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार, ...
गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावे, हे एकच उद्दिष्ट बाळगून शासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार, जिल्हा प्रशासनानेही कंबर कसली असून, जिल्ह्यात १०० लसीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचेच फलीत असे की, जिल्ह्यात बुधवारपर्यंत (दि.९) एकूण २९३१४६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. याची २२.५५ एवढी टक्केवारी आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ४५-६० वयोगटातील नागरिकांचीच सरशी आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशात कहर केला आहे. कित्येक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या या लाटेमुळे झालेली हानी कधीही भरून काढता येणार नाही. अशात आता तिसऱ्या संभाव्य लाटेबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत; मात्र आता कोरोनाला यापुढे पाय पसरू द्यायचे नसेल तर जास्तीत जास्त लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. यामुळेच आता शासन लसीकरणावर जोर देत असून, लसीकरणाची एक चळवळच देशात चालविली जात आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरणासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू असून, यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.
या प्रयत्नांचे फलीत असे की, बुधवारपर्यंत (दि.९) जिल्ह्यात २९३१४६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ४५-६० वयोगटातील १३५२५० नागरिकांनी लस घेतली असून, त्यानंतर ६० वर्षांवरील वयोगटातील ९३३२९ नागरिकांनी लस घेतली आहे. यानंतर आता जिल्ह्यात २२.५५ टक्के लसीकरण झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, लसीकरणासाठी आता गावागावांत शिबिरे व जनजागृती केली जात असल्याने नागरिकांच्या मनातील भीती व भ्रम निवळून ते लसीकरणासाठी पुढे येत आहेत.
-----------------------------
पहिला डोस १७.३० तर दुसऱ्या डोसची ५.३० टक्केवारी
जिल्ह्यात लसीकरणासाठी वेगवेगळे प्रयोग करून लसीकरणाला घेऊन नागरिकांच्या मनातील भीती व भ्रम दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशात गावागावांत शिबिरे घेतली जात आहेत. परिणामी ग्रामीण भागातील जनता आता कोठे लसीकरणासाठी पुढे येत आहे. अशात जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची १७.३० एवढी टक्केवारी असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची ५.३० एवढी टक्केवारी आहे.
-------------------------------
आता लक्ष १८- ४४ वयोगटाकडे
जिल्ह्यात लसीकरणाला आता वेग येत असताना दिसत असून, ही चांगली बाब आहे; मात्र पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण झालेले नाही, असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, १८-४४ वयोगटातील एक मोठा गट लसीकरणापासून वंचित आहे. मध्यंतरी काही मोजक्या दिवसांत या गटासाठी झालेल्या लसीकरणात १३०२१ जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे येत्या २१ तारखेपासून या गटाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर नक्कीच झपाट्याने लसीकरणाची टक्केवारी वाढणार, यात शंका नाही.