२३ वर्षे लोटूनही गोवारी समाजावर अन्यायच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:27 AM2017-12-01T00:27:38+5:302017-12-01T00:27:54+5:30
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्टÑ द्वारे नागपूर विधान भवन येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चात ११४ गोवारी समाजातील बंधू, भगिणी, युवक, युवती, विद्यार्थी शहीद झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : २३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्टÑ द्वारे नागपूर विधान भवन येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चात ११४ गोवारी समाजातील बंधू, भगिणी, युवक, युवती, विद्यार्थी शहीद झाले. या घटनेला २३ वर्षे पूर्ण झाले, पण आजही समाजाला न्याय मिळाला नाही, असे प्रतिपादन गोवारी समाज कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा सर्पा यांनी केले.
आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती, आदिवासी गोवारी मिशन देवरी अंतर्गत गोंडमोहाळी येथे गोवारी समाजबांधवांच्या कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
उद्घाटन गोकुल बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून दामोदर नेवारे, रुपेश चामलाटे, डी.एम. राऊत, सुरेश कोहळे, के.के. नेवारे, लक्ष्मी आंबेडारे, धनराज दुधकवर, जागेश्वर निमजे, सरपंच पौर्णिमा वळगाये, उपसरपंच सुभाष कावळे, गणेश येळे, जी.एस. काळसर्पे, शाखा व्यवस्थापक व समाजबांधव उपस्थित होते.
कृष्णा सर्पा पुढे म्हणाले, राजकीय नेते फक्त सत्ता भोगण्याकरिता आदिवासी गोवारी समाजाचा उपयोग करतात. गोवारी समाज ९० टक्के खेड्यात राहणारा, मोल मजुरी करणारा, गाई चारणारा, पोळा, दिवाळी, होळी या सणामध्ये आपली संस्कृतीने उदर निर्वाह करणारा, भोळा व सर्वांची ऐकणारा समाज असून आपल्या हक्कापासून वंचित आहे. आपल्या हक्कासाठी ११४ आदिवासी गोवारी शहीद झाले, पण सरकारला पाझर फुटले नाही.
आजही गोवारी आदिवासी समाजाची संस्कृती जशीच्या तशीच आहे. शिक्षणामुळे थोडाफार बदल झाला. मात्र ९० टक्के अवस्था तशीच आहे. मग गोवारी आदिवासीला सवलत व नोकरीत टक्केवारी का नाही. फक्त शासनाने दोन टक्के सवलत दिली. त्यातही अनेक जाती समाविष्ट केले. आता समाज जागृत झाला. सरकारला धडा शिकवणारच, न्यायालयापर्यंतही धाव घेणार. असा विश्वास समाजाला देत हिंमत ठेवा, येणाºया हिवाळी अधिवेशनात आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर रूपेश चामलाटे यांनी, माजी आ. नारायणसिंह उईके यांच्या विचारांचा उल्लेख केला. सी.पी. बेरारच्या वेळी त्यांनी विधान सभेत पहिल्यांदाच आदिवासी गोवारी समाजासाठी समोर आले होते. त्यांनी न्यायाची मागणी केली होती. पण १९५० साली आदिवासी बिलात सुधारणा करण्याची मागणी नारायणसिंह उईके यांनी मांडली होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सर्वप्रथम शहीद ११४ आदिवासी गोवारी बांधवांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आदिवासी मुलींनी आदिवासी वेशभूषेत नृत्य सादर केले. संचालन भूमेश्वर सोनेवाने यांनी केले. प्रास्ताविक चेतनलाल शहारे यांनी मांडले. आभार जी.एस. काळसर्पे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आदिवासी समाजातील सर्व नवयुवक, नागरिक व महिलांनी सहकार्य केले.