२३० बालमजूर येणार प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2016 01:30 AM2016-06-12T01:30:54+5:302016-06-12T01:30:54+5:30
शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत काम भीक मागणाऱ्या, ..
नरेश रहिले गोंदिया
शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत काम भीक मागणाऱ्या, मांगगारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बाल मजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना सुरूवातीला बालसंक्रमण शाळांमध्ये टाकले. गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत ४२२ बालमजूर असून त्यातील २३० बालमजूर मुख्य प्रवाहात आले असल्याची माहीती कामगार कार्यालयाने दिली. त्यांना यशस्वी नागरिक म्हणून घडविण्याची संधी शासन उपलब्ध करून देत आहे.
बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. गोंदिया जिल्ह्यात ५ ते १० हजाराच्या घरात बालमजूर असले तरी शासनाकडे त्यांची नोंद आता ४२२ आहे.
या बालमजुरांसाठी गोंदिया शहराच्या यादव चौकात, मुर्री, गोंडीटोला, कुडवा, तिरोडा, पुराडा, मुरकुटडोह दंडारी, गौतमनगर, सोनझरीटोला व एकोडी (नवरगाव) येथे शाळा उघडण्यात आल्या आहेत. त्या बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तत्परता दाखवून या बालकांसाठी शासनाच्या १० संक्रमण शाळा उघडल्या. राष्ट्रीय बालकल्याण समितीमार्फत प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे बालकामारांचे उच्चाटन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. सप्टेंबर २०१५ मध्ये बालमजुरांची तपासणी झाली. त्यात ३९७ बालमजूर जिल्ह्यात आढळले आहेत.
यापूर्वी ७२५ बालमजूर मुख्य प्रवाहात
राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पांतर्गत शोधण्यात आलेल्या बालकामगारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. सन २००५-०६ या वर्षात १९, २००६-०७ मध्ये ८६, २००७-०८ मध्ये २६६, २०११-१२ मध्ये ६३, २०१३-१४ मध्ये २६६, २०१४-१५ मध्ये २, सन २०१५-१६ मध्ये २३ असे ७२५ बालमजूर मुख्य प्रवाहात आले आहेत. तर २०१६-१७ या सत्रात २३० बालमजूर मुख्यप्रवाहात येणार आहेत.
या मिळतात सोयी
बालसंक्रमण शाळेत शिकणाऱ्या बालकांना दर महिन्याला ३५० रूपये निर्वाह भत्ता त्यांच्या खात्यात टाकला जातो. त्यांची नोंदणी शाळेत झाल्यावर त्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन त्यांच्यासाठी मध्यान्ह भोजनाची सोय देखील करण्यात आली आहे.
शिक्षक, इंजिनियर होणार
बालकामगार कार्यालयाने सन २००६ पासून आजतागायत २२०० च्या घरात बालकामगारांना पकडले. त्यापैकी पायभूत शिक्षण सर्वांनी घेतले असले तरी शेकडो बालके दहावी व बारावी झाले. विशेष म्हणजे गोंदियाच्या भीमनगरातील मुनेश शेंडे हा डीएड् करीत असून तो शिक्षक होणार आहे. कुडवा येथील विजय कांबळे हा मुलगा इंजिनियर होत आहे.
बालकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. नुसते शिक्षण देऊन बालमजुरी संपणार नाही तर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना त्यांच्या उत्पन्नाचे साधन तयार करून देण्याचा मानस आहे. बालसंक्रमण शाळेतील मुलांना गणवेश व वगर् शिक्षकांकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यांना सर्व मूलभूत सोयी व शैक्षणिक वातावरणातून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ.विजय सूर्यवंशी
जिल्हाधिकारी, गोंदिया