२३१ मुले शाळाबाह्य

By admin | Published: July 8, 2015 01:36 AM2015-07-08T01:36:59+5:302015-07-08T01:38:03+5:30

शाळाबाह्य मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाकडून शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे.

231 children out of school | २३१ मुले शाळाबाह्य

२३१ मुले शाळाबाह्य

Next

सर्वत्र सर्वेक्षण : १६५ मुलांनी पाहिले नाही अजून शाळेचे तोंड
गोंदिया : शाळाबाह्य मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाकडून शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यात २३१ मुले-मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यांना नियमित शाळेत जाण्यासाठी आता नियोजन केले जाणार आहे.
जिल्ह्यातील २ लाख ७९ हजार २८४ कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी १० हजार ४३४ व्यक्ती सहभागी झाले होते. त्यात शिक्षकांसह इतर विभागांचे कर्मचारी आणि कधीच शाळेत न गेलेल्या तसेच मध्येच शाळा सोडलेल्या बालकांचे व सतत ३० दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येकाच्या घरी, बाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक व शेतात जाऊन हे सर्वेक्षण करायचे होते. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांनी फक्त घरोघरी जाऊनच सर्व्हेक्षण केले. शेतात, बाजारात, रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकात सर्वेक्षण करण्याचा प्रकार क्वचितच काही ठिकाणी घडला.
आमगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ७४ बालके, मध्येच शाळा सोडलेली ३ बालके असे ७७ बालके शाळाबाह्य आढळली. विशेष म्हणजे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एकही मुलगा शाळाबाह्य आढळला नाही. देवरी तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली १० बालके, मध्येच शाळा सोडलेली ७ बालके असे १७ बालके शाळाबाह्य आढळली.
गोंदिया तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ४८ बालके, मध्येच शाळा सोडलेली ३२ बालके असे ८० बालके शाळाबाह्य आढळली. गोरेगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेला १ बालक, मध्येच शाळा सोडलेली ३ बालके असे ४ बालके शाळाबाह्य आढळली. सडक-अर्जुनी तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ८ बालके, मध्येच शाळा सोडलेली ८ बालके असे १६ बालके शाळाबाह्य आढळली. सालेकसा मध्येच शाळा सोडलेली १ मुलगी शाळाबाह्य आढळली. तिरोडा तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली २४ बालके, मध्येच शाळा सोडलेली १२ बालके असे ३६ बालके शाळाबाह्य आढळली.
गोंदिया जिल्ह्यात कधीच शाळेत न गेलेली १६५ बालके, मध्येच शाळा सोडलेली ६६ बालके असे एकूण २३१ बालके शाळाबाह्य आढळली. या सर्वेक्षणात शाळाबाह्य आढळलेल्या या बालकांचे आधार कार्ड काढून दिले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
सर्वेक्षणात स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग
या सर्वेक्षणाच्या कामात शिक्षक, आंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, माविमचे अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या अधिनस्थ असलेले कर्मचारी यांनी सहकार्य घेतला.
अर्जुनी-मोरगावात खरेच झाले का सर्वेक्षण?
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शाळाबाह्य मुले नाहीच, असे म्हटले तर ही बाब तेथील सामाजिकतेच्या गौरवाची बाब आहे. येथे कुणीही बालक शिक्षणापासून वंचित नाही. परंतु खरंच या तालुक्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण प्रामाणिकपणे झाले का? असा प्रश्न उपस्थित होतो. या तालुक्यात भटकंती करणारे लोक नाहीत का? भिकारी नाही का? शाळा सोडून घरी राहणारे किंवा कधीच शाळेत गेले नाही असा एकही बालक या तालुक्यात आढळला नाही. त्यामुळे या तालुक्यात सर्वेक्षण किती प्रामाणिकपणे झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: 231 children out of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.