२३८२ रस्त्यांवर बसलाय यमराज!
By admin | Published: August 6, 2016 01:20 AM2016-08-06T01:20:35+5:302016-08-06T01:20:35+5:30
जलद वाहतुकीमुळे अपघात होतात. परंतु अपघात होण्यामागील महत्वाचे कारण अनेक वेळा खराब रस्तेच
नरेश रहिले ल्ल गोंदिया
गोंदिया : जलद वाहतुकीमुळे अपघात होतात. परंतु अपघात होण्यामागील महत्वाचे कारण अनेक वेळा खराब रस्तेच असतात. जिल्ह्यात असे अपघात आणि मृत्यूला आमंत्रण देणारे तब्बल २ हजार ३८२ रस्ते आहेत. या रस्त्यांचे बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचा अहवाल जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला. परंतु त्यापैकी एकाही रस्त्याच्या दुरूस्तीसाठी शासनाने निधी दिला नाही.
राज्यात गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. नक्षल जिल्ह्याच्या विकासासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे दाखवत प्रत्येक गावाला डांबरी रस्ते देऊन ते तालुका मुख्यालयाशी जोडण्याचा शासनाचा मानस आहे. मग या जिल्ह्यातील रस्त्यांकडे शासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल होत आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढाव्यात गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत किती रस्त्यांची खस्ता हालत आहे याची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १२६ इतर जिल्हा मार्ग, तर २ हजार २५६ ग्रामीण मार्गाची अवस्था बिकट असल्याचा अहवाल त्यांना पाठविण्यात आला. या रस्यांच्या दुरूस्तीसाठी ६८ कोटी १५ लाख ६५ हजारांची गरज असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु या रस्त्यांपैकी एकाही रस्त्याच्या बांधकामाला शासनाकडून मंजूरी देण्यात आली नाही.
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खस्ता झाले असून या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. यातूनच अनेक जीव गेले आहेत. तरीही शासनाचे या रस्त्यांकडे दुर्लक्ष आहे.
पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे
४रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला देण्यात येते. त्या कंत्राटदाराकडून लोकप्रतिनिधी आपली टक्केवारी घेतात. सोबत काम करवून घेणाऱ्या यंत्रणेचे अभियंते व बील काढण्यासाठी लिपीक वर्गाकडून मोठ्या प्रमाणात कंत्राटदाराला पैसे मागितले जाते. त्यामुळे सर्वाना पैसे वाटून स्वत:साठी बचत करण्याच्या नादात कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्त्यांचे बांकाम करण्यात येते. परिणामी रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डे पडून उन्हाळ्यात तयार केलेला रस्ता पावसाळ्यात ‘जैसे थे’ होतो. या प्रकाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
३८ रस्त्यांवर २ कोटी ५८ लाख खर्च
४सन २०१३-१४ या वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे शासनाने दिलेल्या रस्त्यांच्या आराखड्यातील उरलेले २ कोटी ५८ लाख ५२ हजार ३१७ रूपये जिल्ह्यातील ३८ रस्त्यांवर खर्च करण्यात आले. त्यात हिवरा-जबारटोला रस्ता, रापेवाडा-गोंदेखारी रस्ता, दासगाव-मन्नूटोला-सितूटोला रस्ता, अदासी-दागोटोला-दत्तोरा रस्ता, आसोली-मुंडीपार, चुलोद-दतोरा, कामठा- नवरगाव, खातीटोला-दवनीवाडा, शेजगाव-मुंडीपार, गोंदिया-चुलोद, अर्जुनी सिंगलटोला- दाभना सुकडी, कान्होली-सोनारटोला, तावशी-खापरी, जामखारी-आसोली, गिरोला-बोदलाबोडी-दरबडा-पिपरटोला-सावंगी-चिचटोला-पदमपूर, पिपरीया-गल्लाटोला, मुंडीपार-लटोरी, पानगाव-कहाली, आवरीटोला पोचमार्ग, मासुलकसा-पितांबरटोला, अर्जुनी-महागाव-बोरी-अरूणनगर-इंदोरा, इसापूर-महाुरकुडा-धाबेपवनी-रामपुरी, सुकळी-गोठणगाव-खोकरी-चिचोली- केशोरी, परसोडी-घाटबोरी-मरारटोला, सिंदीपार-मुंडीपार-खोडशिवणी, पाटेकुर्रा-झुरकूटोला, हिवरा हिवरा जब्बारटोला, चुटीया-रापेवाडा-गोंदोरी, दासगाव-मन्नूटोला-सितूटोला, अदासी-दागोटोला-दत्तोरा, आसोली-मुंडीपार, चुलोद-दतोरा, नवरगावकला-कामठा, चिरामनटोला-कटंगटोला, घोगरा-मुंडीकोटा, चुरडी-चिखली-मंगेझरी, तुमखेडा-झांजीया-सर्वाटोला व गणखैरा-पुरगाव-सिलेगाव-पाथरी या रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले.