चार दिवसांत शोधली २४५ शाळाबाह्य बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:25 AM2021-02-20T05:25:25+5:302021-02-20T05:25:25+5:30
नरेश रहिले गोंदिया : जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने ९ ते १२ फेब्रुवारी या ४ ...
नरेश रहिले
गोंदिया : जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने ९ ते १२ फेब्रुवारी या ४ दिवसांत शोधमोहीम राबविली होती. त्यातील पहिल्या २ दिवसांत जिल्ह्यातील ४०२ वीटभट्यांवर भेट देऊन १९५ शाळाबाह्य बालके वीटभट्ट्यांवरून शोधण्यात आली. तर ११ व १२ फेब्रुवारी या २ दिवसांत ५० शाळाबाह्य बालके अस्थायी कुटुंबाकडून शोधण्यात आली आहेत.
ही शोधमोहीम विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, तालुका समन्वयक, १०२६ बालरक्षक व शिक्षकांच्या सहकार्याने घेण्यात आली. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे, इयत्ता १ली ते ४ थीच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. इतर राज्यांत अजूनही उच्च प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. काही पालक बालकांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत, तरीसुद्धा शिक्षण सुरू आहे. शिक्षण यंत्रणेतील सर्व अधिकारी-कर्मचारी, बालरक्षक व शिक्षकांनी उत्साहाने शोधमोहिमेत सहभाग घेतला. प्रत्यक्ष शोध घेतल्यावर सर्व बालके आपल्या मूळ गावी शाळेत दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. शोधमोहिमेत आढळलेली बालके स्थलांतर होऊन आली आहेत. ही बालके शाळाबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जवळच्या शाळेत बालकांना दाखल करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
शोधमोहिमेत वीटभट्टीवर १९५ बालके व इतर ठिकाणी ५० अशी एकूण २४५ बालके आढळली आहेत. २७ जानेवारी २०२१ पासून इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थांची शाळा सुरू आहे. सतत ३० दिवस गैरहजर बालके शाळाबाह्य बालकांमध्ये येतात. मार्च २०२१ मध्ये ५वी ते ८वीत सतत ३० दिवस गैरहजर बालकांची माहिती घेण्यात येणार असल्याचे समन्वयिका कुलदीपिका बोरकर यांनी सांगितले.
------------------------------
आमगाव तालुक्यात वीटभट्टीवर सर्वाधिक बालके
शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी ‘मिशन वीटभट्टी’ राबवून शाळाबाह्य मुलांना पकडले. त्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले आमगाव तालुक्यात आढळली असून त्यांची संख्या ५३ आहे. शिवाय, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३, देवरी २०, गोंदिया ४४, गोरेगाव २६, सडक-अर्जुनी ७, सालेकसा २५ व तिरोडा तालुक्यात १७ अशी एकूण १९५ बालके वीटभट्टीवर आढळली आहेत.
-------------------------
भटक्या लोकांकडे आढळली ५० बालके
शाळाबाह्य मुलांचा शोध घेताना गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने ११ व १२ फेब्रुवारी रोजी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली असता अस्थायी कुटुंबातील लोकांकडे ५० शाळाबाह्य बालके आढळलेली आहेत. त्यात गोंदिया तालुक्यात १९, गोरेगाव १३, सडक-अर्जुनी १० व तिरोडा तालुक्यात ८ बालके आढळली आहेत.