पेन्शन परतीच्या नोटीसला करदात्या २४७५ शेतकऱ्यांचा ठेंगा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:34+5:302021-05-29T04:22:34+5:30
गोंदिया : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये मानधन दिले जात आहे. मात्र काही करदाते ...
गोंदिया : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये मानधन दिले जात आहे. मात्र काही करदाते आणि शासकीय नोकरीवर असलेले शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत होते. ही बाब केंद्र शासनाच्या लक्षात आल्यानंतर करदात्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत मागविण्यासाठी शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर यापैकी ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपये मानधनाची रक्कम शासनाकडे जमा केली आहे. नोटीस बजाविल्यानंतर मानधनाची रक्कम परत करण्यासाठी करदाते शेतकरी पुढे येत आहे. या प्रक्रियेला गती सुद्धा आली होती. मात्र डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या प्रक्रियेत अडचण निर्माण झाली होती. पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतंर्गत एकूण ३१७१ करदात्या शेतकऱ्यांकडून ३ कोटी ६७ लाख रुपये प्रशासनाला वसूल करायचे होते. आठही तालुक्यातील तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांचा भरणा शासनाकडे केला आहे. तर २४७५ शेतकऱ्यांकडून अद्यापही पैसे भरण्यात आले नाही. कोरोनाचा संसर्ग तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे यात विलंब होत असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
.................
पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा
पीएम किसान पेन्शन योजनेचे एकूण लाभार्थी : २ लाख ६७ हजार
पैसे परत करण्यासाठी करदात्या शेतकऱ्यांना पाठविली नोटीस : ३१७१
आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी : ६९६
पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी : २४७५
..........................
आतापर्यंत १ कोटी ३९ लाख रुपये वसूल
- पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत एकूण ३१७१ शेतकरी अपात्र ठरले होते. यांना जिल्हा प्रशासनाने मानधनाचे पैसे परत करण्यासाठी नोटीस बजावली होती.
- नोटीस बजाविल्यानंतर ३१७१ शेतकऱ्यांपैकी ६९६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३९ लाख २० हजार रुपये मानधनाची रक्कम प्रशासनाकडे जमा केली आहे.
- कोरोनाचा संसर्ग आणि काही तांत्रिक अडचणीमुळे मानधनाचे पैसे परत करण्यात अडचणी येत असल्याने अद्यापही २४७५ शेतकऱ्यांकडून २ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम परत होणे बाकी आहे.
- पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत अपात्र ठरलेल्यांमध्ये सर्वाधिक करदाते शेतकऱ्यांचा समावेश आहे.
.................
दोन हजारांवर शेतकऱ्यांना अद्यापही लाभ नाही
पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र यापैकी दोन हजारांवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मानधनाचा एकही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे हे शेतकरी अद्यापही शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
...............
कोट
पीएम किसान पेन्शन योजनेतंर्गत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून मानधनाची रक्कम वसूल करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली. यानंतर ६९६ शेतकऱ्यांनी पैसे परत केले. तर उर्वरित शेतकऱ्यांकडून सुद्धा मानधनाची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनामुळे यात काही अडचण आली होती.
- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी