चुकाऱ्यासाठी दिला २५ कोटी रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:07 AM2018-12-08T00:07:23+5:302018-12-08T00:08:09+5:30
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे ३२ कोटी रुपयांचे चुकारे थकल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशीत करताच शुक्रवारी (दि.७) शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला तातडीने २५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे ३२ कोटी रुपयांचे चुकारे थकल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशीत करताच शुक्रवारी (दि.७) शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला तातडीने २५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी काही प्रमाणात दूर करण्यास मदत झाली. तर उर्वरित निधी पाच दिवसांत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात खरिप हंगामातील धान खरेदीला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही धान खरेदीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली नसल्याचे चित्र कायम आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्रीे केलेल्या शेतकºयांना महिनाभराचा कालावधी लोटूनही चुकारे मिळाले नव्हते. जवळपास ३२ कोटी रुपयांचे चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने त्यांना पुन्हा सावकरांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली होती. खरिप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी केली जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धानाचे उत्पादन अधिक झाले आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ६ डिसेंबरपर्यंत ४ लाख ३० हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.तर आदिवासी विकास महामंडळाने दीड लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. मागील आठ दहा वर्षाच्या तुलनेत यंदा विक्र मी धान खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र त्या दृष्टीकोनातून शासनाची तयारी नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत ७५ कोटी रूपयांची धान खरेदी झाली आहे. मात्र यापूर्वी केवळ २२ कोटी रुपयांचे चुकारे झाले होते. चुकारे अडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. हा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला तातडीन शुक्रवारी (दि.७) २५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. तसेच उर्वरित ३० कोटी रुपयांचा निधी पाच दिवसात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान चुकारे करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना थोडीफार मदत झाली आहे.
आवक वाढल्याने समस्या
यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणेसमोर खरेदीचा पेच निर्माण झाला आहे. खरेदीच्या तुलनेत चुकारे करण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ५७ धान खरेदी केंद्रावरुन ६ डिसेंबरपर्यंत ४ लाख ३० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत ७५ कोटी रूपये असून यापूर्वी २२ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले. तर शुक्रवारी २५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करुन दिला.उर्वरित निधी पाच दिवसात मिळण्याची शक्यता आहे.
- नानासाहेब कदम
जिल्हा मार्केटिंग अधिकारी.