२५ हजार महिलांना मिळणार गॅस सिलींडर
By admin | Published: October 15, 2016 12:28 AM2016-10-15T00:28:14+5:302016-10-15T00:28:14+5:30
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील २५ हजार महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप केले
ोंदिया : प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील २५ हजार महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप केले जाणार आहे. या योजनेचा शुभारंभ सोमवारी गोंदियात खा.नाना पटोले यांच्या हस्ते, आ.विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवई यांच्यासह हिन्दुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशन या तीनही कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींचे संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात ६० महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. विदर्भात नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्यात सर्वप्रथम उज्वला योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
केंद्र सरकारच्या विशेष अनुदानातून राबविल्या जात असलेल्या या योजनेतून महिलांचा सामाजिक स्तर उंचावण्यासोबतच त्यांचे आरोग्य सांभाळणे आणि प्रदुषणाला आळा घालणे हा उद्देश आहे. दारिद्र्य रेषेखालील महिलांना हे कनेक्शन वाटप केले जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)