मध्य प्रदेशात जाणाऱ्या २५ फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:44+5:302021-03-21T04:27:44+5:30
गोंदिया : महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मध्य प्रदेश सरकारने येथील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यानुसार गोंदिया ...
गोंदिया : महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता मध्य प्रदेश सरकारने येथील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यानुसार गोंदिया आगारातून मध्य प्रदेश येथे जाणाऱ्या २५ फेऱ्या शनिवारपासून (दि. २०) बंद रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली असून, याबाबत शुक्रवारी (दि. १९) गोंदिया आगाराला तसे आदेश मिळाले आहेत.
राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येत बाधितांची संख्या वाढत चालली असून, कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची पाळी आली आहे. अशा स्थितीत प्रवाशांची ये-जा सुरू राहिल्यास त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब हेरून मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून तेथे जात असलेल्या बस फेऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. २० मार्चपासून येत्या ३१ मार्चपर्यंत या फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच, मध्य प्रदेशात जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसेस आता मध्य प्रदेशात जाणार नाहीत व अशात महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांचा बसेसद्वारे असलेला संपर्क तुटणार आहे.
या आदेशानुसार, गोंदिया आगारालाही शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी बसफेऱ्या बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश राज्याची सीमा जेमतेम २० किलोमीटर असून तेथील नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज गोंदियात येतात. यात बसने त्यांचा प्रवास जास्तीतजास्त प्रमाणात होतो. मात्र, आता बसफेऱ्या बंद पडल्याने त्यांची गैरसोय होणार आहे. शिवाय, गोंदिया आगाराच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होणार यात शंका नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही राज्यांच्या सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. गोंदिया आगारातून मध्य प्रदेश राज्यात एकूण २५ फेऱ्या जात होत्या. यामध्ये १ लांजी, १९ बालाघाट तर ५ रजेगावच्या फेऱ्या आहेत. मात्र, आता या आदेशानंतर या २५ फेऱ्या पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.
----------------------------
डोंगरगड फेरीही बंद
मध्य प्रदेश राज्याला बस फेऱ्या जोडत असतानाच छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथेही गोंदिया आगाराची १ फेरी होती. मात्र, सध्या ती फेरीही बंद करण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडासाठीही गोंदिया आगारातून बस जात होती. ती फेरीही २१ फेब्रुवारीपासून बंद असून, सध्या ती फेरी सावनेरपर्यंतच जात आहे.
-----------------------
तिरोडा आगाराच्या ४ फेऱ्या बंद
मध्य प्रदेश राज्यात गोंदिया आगाराच्या फेऱ्या जात असतानाच जिल्ह्यातीलच तिरोडा आगारातून ४ फेऱ्या बालाघाटला जात होत्या. मात्र, आता त्यांच्या या ४ फेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. एकंदर दोन्ही आगारांकडून दोन्ही राज्यांतील प्रवाशांसाठी असलेली ही सुविधा आता खंडित झाली आहे.